डॉक्टरांविना रुग्णांचे हाल

By admin | Published: November 17, 2016 05:32 AM2016-11-17T05:32:37+5:302016-11-17T05:32:37+5:30

वेळेवर वैद्यकीय उपचार होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो.

The condition of the patient without the doctor | डॉक्टरांविना रुग्णांचे हाल

डॉक्टरांविना रुग्णांचे हाल

Next

गिरीश गोरेगावकर

माणगाव : येथील उपजिल्हा रुग्णालय शेवटची घटका मोजत असून रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.गौतम देसाई हे सर्व पातळीवर एकाकी झुंज देत असल्याने रुग्णांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. वेळेवर वैद्यकीय उपचार होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो.
माणगाव मुंबई-गोवा महामार्गावरील जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून याठिकाणी गरीब रुग्णांना व अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत माणगावचे पहिले आमदार द. मा. तळेगावकर यांनी संघर्ष करून पेण येथे होणारे रुग्णालय माणगावला आणले. रुग्णालयाचा वाढता पसारा लक्षात घेता तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी इमारतीचे नूतनीकरण करून त्यामध्ये विविध विभागांची निर्मिती करीत आवश्यक पदे निर्माण केली. उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. माणगावसारख्या महत्त्वाच्या व सोयीस्कर असलेल्या या रु ग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर व तांत्रिक कर्मचारी हजर झाल्यास अनेकांना दिलासा मिळू शकतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयामध्ये डॉ.गौतम देसाई वगळता एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने रु ग्णालयाचीच हालत खराब झाली आहे. माणगाव शहरात सुमारे ३० ते ३५ खाजगी दवाखाने आहेत. सरकारी रुग्णालयात डॉक्टर नसल्याने तेथे रुग्णांची खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या खाजगी रुग्णालयात खेड, पोलादपूर, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, दापोली व इतर शहरातील रुग्ण दररोज उपचाराकरिता दाखल होत असतात. त्यामुळे या रुग्णालयासाठी कोणत्याही सोयी-सुविधा व उपाययोजना न केल्याने रुग्णांना नाइलाजाने वारेमाप खर्च करून खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागत आहे. आ.सुनील तटकरे हे पालकमंत्री असताना माजी आमदार अशोक साबळे यांच्यासमवेत मंत्रालय मुंबई येथील आरोग्य मंत्र्यांच्या दालनात अनेक वेळा बैठका झाल्या, मात्र तरीही डॉक्टर अद्यापही हजर झालेले नाहीत. तांत्रिक साहित्य व उपकरणे तशीच कर्मचाऱ्यांविना धूळ खात पडली आहेत. लाखो रुपयांचे सिटीस्कॅन मशीन व इतर तांत्रिक उपकरणे कर्मचारी नसल्याने बंद अवस्थेत आहे.

Web Title: The condition of the patient without the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.