खाण घोटाळ्याची न्यायालयीन/एसीबी चौकशी करा

By योगेश पिंगळे | Published: May 26, 2023 06:18 PM2023-05-26T18:18:48+5:302023-05-26T18:19:17+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादीसह संघर्ष समितीची मागणी, आंदोलनाचा इशारा

Conduct a judicial/ACB inquiry into the mining scam | खाण घोटाळ्याची न्यायालयीन/एसीबी चौकशी करा

खाण घोटाळ्याची न्यायालयीन/एसीबी चौकशी करा

googlenewsNext

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : शहरातील स्वराज क्रशर स्टोन एलएलपी कंपनीने पनवेल, उरण महसूल क्षेत्रातील बेकायदा दगडखाणी, खनिजकर्म वसुली शासनाच्या परवानगीशिवाय एकाधिकारशाहीने आर्थिक व्यवहार सुरू ठेवले असून, यामुळे हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी केला. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांची त्रिसदस्यीय कमिटी अथवा राज्याच्या लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करण्याची मागणी पाटील आणि पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी शुक्रवारी वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

उरण, पनवेल परिसरात सुमारे १०० ते १२५ क्रशर आणि दगडखाणी आहेत. स्वराज स्टोन एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून साम, दाम, दंड आणि भेद या मार्गाने सर्व दगडखाणींचे अग्रीमेंट करण्याचे काम सुरू असून, प्रकल्पग्रस्त, क्रशर, दगडखाण मालकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कंपनीची मक्तेदारी सुरू असल्याने खडीचे भाव वाढणार असून, त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

स्वराज कंपनीने आणली खोके पॉलिसी

दादागिरी मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, २७ गाव संघर्ष समिती, पनवेल तालुका काँग्रेस कमिटी, पनवेल संघर्ष समिती यांची बैठक घेऊन या विरोधात आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे कडू यांनी सांगितले. स्वराज कंपनीने काही क्रशर मालकांसोबत अग्रीमेंट केले असून, राज्यात सुरू असलेली खोके पॉलिसी या कंपनीने आणली असल्याचा आरोप कडू यांनी केला.

रेतीप्रमाणे खडीचेही दर नियंत्रित करा

राज्य शासनाने ज्याप्रमाणे वाळू उपसाचे दर नियंत्रित केले आहेत त्याप्रमाणे खडीचेदेखील करावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यामध्ये मोठा घोटाळा झाला असून, शासनाच्या महसूल विभागासह इतर विभागदेखील सहभागी आहेत. ही कंपनी आल्यापासून क्रशर आणि क्वारीमालकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम सुरू आहे. महागाईचा भडका उडविणाऱ्या या कंपनीविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Conduct a judicial/ACB inquiry into the mining scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.