विकास आराखड्यावर विशेष सभेत गोपनीय चर्चा; सभागृह परिसरात प्रवेशबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 12:13 AM2019-12-14T00:13:07+5:302019-12-14T00:13:34+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.
नवी मुंबई : प्रशासनाने सर्वसाधारण सभेमध्ये मांडलेल्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभागृह परिसरात पत्रकारांसह नागरिकांनाही बंदी घातली होती. रात्री १० वाजेपर्यंत सभेचे कामकाज सुरू होते.
नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या सर्व सभांचे व विशेष सभांचे कामकाज पाहण्यासाठी पत्रकारांसह नागरिकांनाही प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रवेश दिला जातो; परंतु या सभेसाठी कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. प्रेक्षक गॅलरी, पत्रकारकक्षाकडे कोणी जाऊ नये यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
विकास आराखड्यास महासभेने मंजुरी दिल्यानंतर सूचना व हरकती मागविण्यासाठी तो प्रसिद्ध केला जाणार आहे. तेव्हा तो सर्वांना उपलब्ध होणार असून, तोपर्यंत तो गोपनीय ठेवण्यासाठी कोणालाही प्रवेश देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. बेलापूर ते दिघापर्यंत प्रत्येक प्रभागामध्ये आराखड्यामध्ये कशाचा समावेश आहे याची माहिती सर्व नगरसेवकांना देण्यात आली. नगरसेवकांनी या आराखड्यामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये काय हवे त्याविषयी सूचना मांडल्या.
प्रत्येक नोडमध्ये मैदान, उद्यान, आरोग्य व इतर सुविधांसाठी भूखंडांचे आरक्षण आहे का? याविषयी नगरसेवक दक्ष असल्याचे पाहावयास मिळाले. रस्ता रुंदीकरणासह इतर अनेक प्रकारच्या सूचना या वेळी करण्यात आल्या. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आराखड्यामध्ये त्यांच्या पद्धतीने सूचना केल्या. विकास आराखड्यामध्ये सिडकोच्या अनेक भूखंड सामाजिक सुविधांसाठी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली. कोणत्या भूखंडावर काय आरक्षण असावे हेही सूचित करण्यात आले.
रात्री १० वाजेपर्यंत सभेचे कामकाज सुरू होते. या सभेनंतर नगरसेवकांची समिती नियुक्ती केली जाणार आहे. आराखड्यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्यानंतर त्या हरकतींचे निराकरण ही समिती करणार आहे. यानंतर आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्राच्या भविष्याचा विचार करून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. बैठकीमधील चर्चा गोपनीय राहवी, यासाठी सभेसाठी नगरसेवकांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. महासभेच्या मंजुरीनंतर विकास आराखड्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत.
- जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई