औद्योगिक वसाहतीला समस्यांचा विळखा; डेब्रिज टाकून रोड अडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:34 AM2019-06-04T01:34:10+5:302019-06-04T01:34:18+5:30

डेब्रिज माफियांनीही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे

Conflicts of industrial colonies; Delivering the bridge blocked the road | औद्योगिक वसाहतीला समस्यांचा विळखा; डेब्रिज टाकून रोड अडविला

औद्योगिक वसाहतीला समस्यांचा विळखा; डेब्रिज टाकून रोड अडविला

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : एमआयडीसीमधील चुनाभट्टी परिसरामध्ये उद्योजकाने अनधिकृतपणे भराव टाकून रोडची उंची वाढविली आहे. प्लांटमधील पाणी व धूळ रोडवर पसरू लागली आहे. या परिसरात डेब्रिज टाकून रोडच बंद केला असून या अतिक्रमणांकडे महापालिकेसह एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करू लागले आहे.

येथील चुनाभट्टी वसाहतीला लागून असलेल्या कंपनी चालकाने काही महिन्यापूर्वी महापालिकेच्या रोडवर तीन फुटांचा भराव टाकला आहे. स्वत:च्या कंपनी समोरील रोडची उंची अनधिकृतपणे वाढविण्यात आली आहे. याचा फटका येणाऱ्या पावसामध्ये समोरील दोन कंपनींना बसणार आहे. पावसाचे पाणी त्या कंपनीमध्ये जाणार आहे. याशिवाय रोडवर भराव टाकताना नैसर्गिक नाला बुजविला आहे. यामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्गच राहिलेला नाही. या अतिक्रमणाविषयी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती; परंतु त्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे सर्वांच्या सहमतीनेच हा भराव केला असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. याच पसिरामध्ये स्वस्तिक कंपनीचा रेडी मिक्स प्लांट आहे. कंपनीची मिक्सर वाहने रोडच्या दोन्ही बाजूला उभी करण्यात येत आहेत. स्वस्तिक व डोंगराकडील दगडखाणीमधील सांडपाणी रोडवर येऊ लागले आहे. यामुळे उन्हाळ्यामध्येही रोडवर चिखल तयार झालेला असतो. येथून जाताना मोटारसायकलचे वारंवार अपघात होऊ लागले आहेत. प्लांटमधील धूळ मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये पसरू लागली आहे. रोडवरही धुळीचे साम्राज्य निर्माण झालेले असते. याविषयी तक्रार करण्यात आली असून, प्रशासनाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही.

डेब्रिज माफियांनीही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. फ्लेमिंगो कंपनीच्या पुढील बाजूला एक वर्षापूर्वी रोडवरच डेब्रिज टाकण्यात आले होते. संपूर्ण रोडच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर डेब्रिज हटविण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुन्हा रोडच्या मध्यभागी डेब्रिज टाकण्यात आले आहे. पुन्हा हा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी नाल्यामध्येही भराव करण्यात आला नाही. नाल्याचा आकार कमी झाला असून, पावसाचे पाणी रोडवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दगडखाणींच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जमिनीवरही अतिक्रमण करण्यात येत आहे. या ठिकाणी गणेश उत्सवासाठी टाकलेला मंडप अद्याप हटविण्यात आलेला नाही. या परिसरामधील डेब्रिज माफियांवर कधी कारवाई केली जाणार व उद्योजकांनी रोडवर केलेल्या अतिक्रमणावर काय कारवाई केली जाणार याविषयी माहिती घेण्यासाठी परिमंडळ एक चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व तुर्भेचे कार्यकारी अभियंता मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला; परंतु दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही.

रोडवर डेब्रिजचा भराव टाकला आहे. रोड वाहतुकीसाठी बंद केला आहे. एका कंपनी चालकाने रोडवर भराव टाकला आहे. रेडी मिक्स कंपनीची धूळ व पाणीही रोडवर येऊ लागले आहे. तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही. - महेश कोठीवाले, विभागप्रमुख शिवसेना

कारखान्यांचे वाढीव बांधकाम
चुनाभट्टी, बोनसरीसह दिघा ते नेरुळ दरम्यान अनेक कंपनी चालकांनी वाढीव बांधकाम केले आहे. अनेकांनी शेड वाढविले आहेत. नाल्यांमध्ये भराव टाकून त्यामध्ये अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेल्या अतिक्रमणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सर्व कारखान्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमण हटविण्याची मागणीही नागरिकांनी करण्यास सुरुवात केली आहे.

या परिसरात दगडखाणींच्या खालील बाजूला असलेल्या जमिनीवरही अतिक्रमण होऊ लागले आहे. याच ठिकाणी एक कंपनीने जनरेटरसेट बसविण्यासाठी शेड उभारले आहे. या शेडसाठीही परवानगी घेतली आहे की नाही, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

Web Title: Conflicts of industrial colonies; Delivering the bridge blocked the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.