डायरेक्ट टू होम संकल्पनेचा बोजवारा; किराणा माल, भाजीपाला लॉकडाऊनमध्ये अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:19 AM2020-07-19T00:19:54+5:302020-07-19T00:20:10+5:30
नागरिकांमध्ये नाराजी
अलिबाग : लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये घरपोच किराणा आणि भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा दावा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केला होता. मात्र, अद्यापही जिल्हा प्रशासन अशी कोणती व्यवस्था निर्माण करू शकलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भा$वाला अटकाव करण्यासाठी १६ जुलैपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मेडिकल आणि दूध वगळता भाजीपाला आणि किराणा मालाच्या विक्रीवरही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.
महानगरात फोफावलेला कोरोना विषाणू सुरुवातीला ग्रामीण भागात पोहोचला नव्हता. मात्र, चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने, तसेच ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई-पुणे, ठाणे या विभागातील नागरिक मोठ्या संख्येने जिल्ह्यात आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या स्तरावर तीन ते सात दिवसांपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्याला सुरुवात केली. मात्र, एका ठिकाणी लॉकडाऊन असताना दुसऱ्या ठिकाणी मोकळीक होती. त्यामुळे अशा प्रकारचे लॉकडाऊन फोल ठरत होते, तर दुसरीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सरकार आणि प्रशासनासह नागरिकांची चांगलीच झोप उडाली होती. यावर तातडीने उपाययोजना करण गरजेचे असल्याने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रमुख प्रशासकीय अधिकारी, पोलीस विभागातील प्रमुख यांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये १६ जुलै ते २६ जुलै, २०२० या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर केला.
किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत असल्याने, त्या वस्तूंच्या खरेदीवर थेट निर्बंध आणत, त्यांना लॉकडाऊनचे कक्षेत आणण्यात आले. पर्यायी व्यवस्था म्हणून अशा वस्तूंची घरपोच सेवा देण्यावर भर देणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले होते.
अलिबागमधील काही किराणा मालाच्या दुकानदांराशी संपर्क साधला असता, आमच्याकडे कोरोनामुळे कामाला माणसे कमी आहेत, त्यामुळे यंत्रणा उभी कराला वेळ लागेल, असे सांगण्यात आले. काही भाजीविक्रेते हे ओळखीच्या ठिकाणी, तसेच नेहमीच्या ग्राहकांकडे भाजीपाला पोहोचवण्याचे काम करत असल्याचेही सांगण्यात आले. परंतु ज्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नाहीत, अशा नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.दरम्यान, पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये किराणा माल आणि भाजीपाला घरपोच मिळणार होता. मात्र, अद्याप तशी सुविधा उपलब्ध झालेली नाही. लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी अजून सात दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. सरकार आणि प्रशासनाने तशी व्यवस्था करावी.
- किशोर देशमुख, रहिवासी, अलिबाग
मागच्या दाराने विक्री सुरू?
जिल्ह्यामध्ये असे काही व्यापारी, दुकानदार आहेत की, जे नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून अथवा स्वत:च्या फायद्यासाठी मागच्या दाराने दुकानाची दारे उघडी ठेवत आहेत. वस्तूंची खरेदी करण्यामध्ये अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते, परंतु ज्यांना असे पर्याय माहिती नाहीत, अथवा बाहेरच पडता येत नाही. त्यांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी मद्यविक्रीही मागच्या दाराने होत असल्याची चर्चा आहे.