नवी मुंबई : नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रस्तावावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला. स्मार्ट सिटीसाठी करवाढ करण्यास व एसपीव्ही प्रणालीस राष्ट्रवादीने तीव्र विरोध केला. सूचनांसह फेरप्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. शिवसेना व भाजपाने मूळ प्रस्तावाचे स्वागत करून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धा व अमृत योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठीचा प्रस्ताव डिसेंबरमध्ये सर्वसाधारण सभेत मांडला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रस्तावास तीव्र विरोध क रून तो फे टाळला. यानंतर २० जानेवारीला आलेल्या सभेत पुन्हा प्रस्ताव मांडण्यात आला. परंतु त्यावर चर्चा झाली नाही. मंगळवारी झालेल्या महासभेमध्ये यावर चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी सर्वप्रथम त्यांची भूमिका मांडावी, अशी मागणी शिवसेनेने केली. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. महत्त्वाच्या विषयावर सर्वपक्षांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेणे आवश्यक होते. परंतु सर्वांशी चर्चा करण्याचे सौजन्य महापौर व राष्ट्रवादीने दाखविले नसल्याचे स्पष्ट केले. नामदेव भगत, एम.के. मढवी, किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर यांनी राष्ट्रवादीवर टीका करून स्मार्ट सिटीही झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली.राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही स्मार्ट सिटी झालीच पाहिजे, परंतु त्यासाठी एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल)ला आमचा विरोध आहे. नवी मुंबईकरांवर कोणताही कर लादला जावू नये अशी उपसूचना मांडली. या सूचनांसह प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी आणावा, अशी मागणी करुन प्रस्ताव पुन्हा प्रशासनाकडे पाठविला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे सभा गाजली. विरोधकांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रवादीचे सूरज पाटील, अनंत सुतार, सभागृहनेते जयवंत सुतार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही स्मार्ट सिटीच्या विरोधात नसून करवाढ व एसपीव्हीच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले. शेवटी बहुमताच्या बळावर प्रस्ताव पुन्हा आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
स्मार्ट सिटी प्रस्तावावरून महासभेत गोंधळ
By admin | Published: February 03, 2016 2:24 AM