नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या कांदा-बटाटा बाजारपेठेत असणाऱ्या उपाहारगृहांच्या जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, जाहिरातीत नमूद उपाहारगृहांच्या जागा पाहता मुुख्य रस्त्यावरील जादा क्षेत्रफळाच्या उपाहारगृहासाठी कमी भाडे आणि आतील भागात कमी क्षेत्रफळाच्या उपाहारगृहासाठी जादा भाडे आकारण्याचा प्रताप बाजार समितीच्या संबंधित विभागाने केला आहे.
बाजार समितीने आपल्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारातील एक आणि कांदा-बटाटा बाजार आवारातील इतर सहा अशा सात उपाहारगृहांच्या जागा भाडेतत्त्वार देण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात मोक्याच्या ठिकाणी असलेले मुख्य प्रशासकीय इमारतीत असणारे १०८९ चौरस फुटाच्या उपाहारगृहासाठी एक लाख रुपये अनामत रक्कम आणि २७ हजार रुपये किमान मासिक भाडे नमूद केले आहे. मात्र, दुसरीकडे इतर विंगमधील ३०० चौरस फुटांच्या सहा उपाहारगृहांसाठी २६ ते ३६ हजार भाडे नमूद केले आहे. बाजार समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तोडलेल्या या अकलेच्या ताऱ्यांमुळे कांदा-बटाटा बाजार आवारातील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
शौचालय वाटप घोटाळ्याचा बोध नाही
बाजार समितीच्या विविध बाजारपेठांमधील सुलभ शौचालयांच्या वाटपात सात कोटी ६१ लाखांचे नुकसान झाल्याचे ठपका ठेवून बाजार समितीच्या सात अधिकारी आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भाडे करारात गफलत झाल्याचेही याबाबतच्या चौकशी अहवालात म्हटले आहे. मात्र, यातून बोध न घेता बाजार समितीच्या संबधित अधिकाऱ्यांनी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जास्त क्षेत्राच्या उपाहारगृहासाठी कमी भाडे आणि आतील भागात असलेल्या कमी क्षेत्राच्या उपाहारगृहासाठी जादा भाडे नमूद करून शौचालय वाटपाची पुनरावृत्ती केली आहे.