नवी मुंबईत मतदार याद्यांमध्ये घोळ; अनेकांची नावे गायब, एकाच नंबरवर दोघांची नावे
By नामदेव मोरे | Published: May 16, 2024 07:19 PM2024-05-16T19:19:31+5:302024-05-16T19:19:52+5:30
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नवी मुंबईमधील ऐरोली विधानसभा क्षेत्रात ४ लाख ३९ हजार व बेलापूर मतदारसंघात ३ लाख ७९ हजार मतदारांचा समावेश आहे.
नवी मुंबई : मतदान चार दिवसांवर आले असतानाही मतदार याद्यांमधील घोळ अद्याप संपलेला नाही. अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाली आहेत. एकाच आयटीआर नंबरवर दोन मतदारांचे नाव असल्याचेही निदर्शनास आले असून या गोंधळामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नवी मुंबईमधील ऐरोली विधानसभा क्षेत्रात ४ लाख ३९ हजार व बेलापूर मतदारसंघात ३ लाख ७९ हजार मतदारांचा समावेश आहे. याशिवाय आचारसंहिता लागू केल्यानंतर अनेक नागरिकांनी ऑनलाइन अर्ज भरला आहे. परंतु, यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या अनेकांची नावे मतदार यादीमधून गायब झाली आहेत. काही तरुणांनी ऑनलाइन अर्ज भरला. परंतु, त्यांचे नावच यादीमध्ये आलेले नाही. बेलापूर मतदारसंघामध्ये राहणाऱ्या रेवती बंगेरा यांचे मतदार यादीमध्ये नाव होते. त्यांनी २०१९ च्या निवडणुकीमध्ये मतदानही केले आहे. परंतु, २०२४ च्या मतदार यादीमधून त्यांचे नाव गायब झाले आहे. मतदारयादीमध्ये नाव नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेलापूर परिसरातील दीपक साठे यांचा आयटीआर नंबर ४००३७२९ असा आहे. या नंबरचे निवडणूक ओळखपत्रही त्यांच्याकडे आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीसाठी हा आयटीआर नंबर सरीला तानवडे यांच्या नावावर दाखविला जात आहे.
घणसोली परिसरामध्येही अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाली आहेत. राजश्री जाधव व त्यांच्या कुटुंबीयांची नावे मतदारयादीमध्ये आलेली नाहीत. मोहित जाधव या तरुणाने ऑनलाइन अर्ज भरला होता. अर्ज भरल्याविषयी संदेशही प्राप्त झाला होता. पण प्रत्यक्षात मतदारयादीमध्ये त्याच्या नावाचा समावेश झालेला नाही. ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी अशाप्रकारे मतदार यादीमधून अनेकांची नावे गायब झाली असून त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे.