परिवहन समिती सदस्य निवडीवरून महासभेत विरोधकांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 01:05 AM2019-06-30T01:05:38+5:302019-06-30T01:05:57+5:30
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समितीमधील सहा सदस्य निवृत्त होत आहेत, या सहा रिक्त झालेल्या जागांवर नव्याने सहा सदस्यांची निवड महासभेत होणार होती यासाठी यामध्ये राष्ट्रवादीचे ५, काँग्रेस १, शिवसेनेचे २ असे एकूण आठ उमेदवार रिंगणात होते.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समिती सदस्यांची शनिवार, २९ जून रोजी झालेल्या महासभेत निवड करण्यात येणार होती. सदस्य निवडीसाठी मतदानाने निवड होणार असल्याने शिवसेना सदस्यांनी महासभेत गोंधळ घालून महापौरांना घेराव घातला. गोंधळानंतर पार पडलेल्या निवडणूक प्रक्रि येत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी झाले.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समितीमधील सहा सदस्य निवृत्त होत आहेत, या सहा रिक्त झालेल्या जागांवर नव्याने सहा सदस्यांची निवड महासभेत होणार होती यासाठी यामध्ये राष्ट्रवादीचे ५, काँग्रेस १, शिवसेनेचे २ असे एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. याआधी नवी मुंबई महापालिकेतील विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार परिवहन समितीमध्ये सदस्यांची निवड व्हायची; परंतु या वेळी मात्र सदस्य निवडीसाठी मतदान केले जाणार असल्याने नगरसेवकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या वेळी या विषयावर चर्चा करताना शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी नवी मुंबई महापालिकेत आजपर्यंत ज्या पद्धतीने परिवहन सदस्यांची निवड केली जात होती, त्याप्रमाणे या वेळीही निवड करण्याची महापौरांना विनंती केली; परंतु महापौर जयवंत सुतार यांनी मतदान होणार असल्याचे जाहीर करून प्रक्रि या सुरू केल्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालत विषयपत्रिका फाडून महापौरांना घेराव घातला. महापौर सुतार यांनी सदस्यपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची नावे घोषित केल्यावर नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. यामध्ये काँग्रेसचे रणजित सिंह धालीवाल, राष्ट्रवादीचे चंद्रकांत अगोंडे, निरंत पाटील, दिलीप म्हात्रे, आत्माराम पाटील, भालचंद्र वाडकर या उमेदवारांना राष्ट्रवादी आणि काँग्रेच्या ६३ नगरसेवकांनी मतदान केले. गोंधळानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केल्याने शिवसेनेच्या अतुल कुलकर्णी, प्रकाश चिकणे या दोन सदस्यांना मते मिळाली नाहीत. त्यानंतर या मतप्रक्रियेत विजयी झालेल्या सदस्यांचे महापौरांनी अभिनंदन केले.
राजदंड पळवला
परिवहन समिती सदस्य निवडीवर महासभेत झालेल्या गोंधळात शिवसेना नगरसेवकांनी राजदंड पळवून सभागृहाबाहेर नेला. या वेळी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ यांनी राजदंड पळविणाऱ्या नागरसेवकांवर कारवाईची मागणी केली; परंतु काही वेळात राजदंड पुन्हा सभागृहात आणण्यात आला.