वैभव गायकर
पनवेल : कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्याचा तपास नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झालेल्यांची यादी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी अनेक नामसाधर्म्य व्यक्ती पनवेलमध्ये राहत असल्याने गोंधळ निर्माण झाला.
जिल्हा विशेष लेखा परीक्षक उमेश तुपे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे दाखल केलेल्या आरोपींच्या यादीमध्ये पूर्ण पत्ता नसल्याने पनवेल परिसरात आरोपींच्या नावांवरून गोंधळ उडाला. संदीप भरत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुर्बी गावातील रहिवासी शिवसेनेचे पनवेल तालुका संघटक भरत पाटील यांच्या मुलाचे नावही संदीप असल्याने भरत पाटील यांना चौकशीसाठी फोन आले. त्यानंतर पाटील यांनी सोशल मीडियावर खुलासा करीत या गुन्ह्यात माझ्या मुलाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ७६ जणांपैकी चार ते पाच नामसाधर्म्य व्यक्ती पनवेल उरण परिसरात राहत आहेत. त्यांनाही अशाच प्रकारचा अनुभव आला आहे. अशाच प्रकारे दुसरे नाव मुर्बी गावातील विलास फडके यांचे आहे.समान नावाच्या व्यक्ती तालुक्यात अनेक असून संबंध नसणाऱ्या व्यक्तींची विनाकारण बदनामी होऊ नये म्हणून गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींच्या नावासोबत, वय, व्यवसाय व पत्ता नमूद करणे आवश्यक होते, असे भरत पाटील यांनी सांगितले.गुन्हे दाखल झालेल्या आरोपींच्या नावांवरून गोंधळ निर्माण झाला असेल, तर पुन्हा पत्त्यांसह आरोपींची नवी यादी जाहीर केली जाईल.- शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे