नवी मुंबई : सार्वजनिक रुग्णालयासाठी वाशी सेक्टर १0 येथे दिलेला भूखंड परस्पर हिरानंदानी हेल्थ केअर कंपनीला देवून महापालिकेने करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याचा ठपका सिडकोने ठेवला आहे. त्यानुसार सिडकोने महापालिकेला नोटीस बजावली असून सदर भूखंड वाटप रद्द केल्याचे त्यात नमूद केले आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भूखंड वाटपातील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या भूखंडधारकांच्या विरोधात सिडकोने कठोर कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत वाशी रेल्वे स्थानकाजवळ अरुणाचल प्रदेश सरकारला अतिथीगृहासाठी दिलेल्या भूखंडाचे वाटप रद्द करण्याची कारवाई अलीकडेच सिडकोने केली आहे. त्यापाठोपाठ महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या भूखंडावरही सिडकोने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. सिडकोने सार्वजनिक रुग्णालय सुरू करण्यासाठी ९ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड महापालिकेला दिला होता. महापालिकेने त्यातील एक लाख चौरस फूट जागा हिरानंदानी हेल्थ केअरला देवून टाकली. पुढे हिरानंदानीने ही जागा करार करून फोर्टीज ग्रुपला दिली. या संपूर्ण प्रक्रियेत सिडकोबरोबर झालेल्या करारातील अटी व शर्तीचा भंग झाल्याचा ठपका सिडकोने ठेवला आहे. त्यानुसार सदर भूखंड वाटप रद्द केल्याची नोटीस महापालिकेला बजावली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने हिरानंदानीसोबत केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिडकोला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोने २१ आॅगस्ट २0१४ रोजी याप्रकरणी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. इतकेच नव्हे, तर यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर १६ डिसेंबर २0१५ रोजी सुनावणी झाली. जनसमूह व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने पुढील तीन महिन्यात राज्य सरकार आणि सिडकोने सध्याच्या कायद्याचा आधार घेत यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सिडकोने सदर भूखंड वाटप रद्द करुन महापालिकेला दणका दिला आहे. सिडकोच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. (प्रतिनिधी)
मनपा मागणार शासनाकडे दाद
By admin | Published: January 21, 2016 2:55 AM