सिडकोच्या प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाला काँग्रेसचाही विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 05:21 AM2020-01-29T05:21:47+5:302020-01-29T05:21:57+5:30
खांदेश्वर, मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरातील तसेच खांदा वसाहतीतील बस टर्मिनलच्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत इमारती बांधल्या जाणार आहेत.
कळंबोली : खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर मोकळ्या जागेत म्हणजेच बस आणि पार्किंगच्या जागेवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी बिल्डरचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाला सर्वांनीच विरोध केला आहे. मंगळवारी काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रवक्ते सचिन सावंत यांनी, खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात भेट देऊन गृहप्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. या वेळी हा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलविण्याबाबत सिडकोत जाऊन रहिवासी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी निवेदन दिले.
सिडको एकूण सात ठिकाणी जवळपास एक लाख घरे पंतप्रधान आवास योजनेच्या नावावर बांधत आहे. त्याकरिता बस स्थानक, पार्किंगची जागा आणि ट्रक टर्मिनल्स निवडण्यात आले आहेत.
खांदेश्वर, मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरातील तसेच खांदा वसाहतीतील बस टर्मिनलच्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत इमारती बांधल्या जाणार आहेत. रहिवाशांनी गृप्रकल्पाला नाही. मात्र, त्या जागेला विरोध केला आहे. मंगळवारी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी खांदेश्वर येथे येऊन प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. कामोठे नागरी हक्क संरक्षण समितीच्या सदस्यांनी हा प्रकल्प कसा चुकीचा आहे, हे सावंत यांना पटवून दिले. या वेळी रहिवाशांच्या सुविधांवर टाच येणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.
खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरातील पाहणी केल्यानंतर सावंत यांनी सहव्यवस्थापकीय संचालक सिडको यांची भेट घेऊन प्रकल्प पार्किंग बस डेपो आणि ट्रक टर्मिनलच्या जागेवर होऊ नये, अशी मागणी केली. या वेळी रंजना सडोलीकर, संतोष चिखलकर, अॅड. सुलक्षणा जगदाळे, शिवाजी थोरवे, हेमराज म्हात्रे, किशोर ठोंबरे, अजिनाथ सावंत, संतोष पावडे, राजेंद्र चौधरी, चंद्रकांत नवले आदी उपस्थित होते.