अनिकेत म्हात्रे ऐरोलीचे तर शार्दूल कौशिक बेलापूरचे निरीक्षक
By नारायण जाधव | Published: February 24, 2024 07:06 PM2024-02-24T19:06:20+5:302024-02-24T19:06:47+5:30
जुन्या जाणत्या नेत्यांऐवजी काँग्रेसचे युवा नेत्यांना बळ.
नवी मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातील ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांची तर बेलापूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे युवा नेते शार्दूल कौशिक यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेसने जुन्या जाणत्या नेत्यांऐवजी युवा नेत्यांना बळ दिल्याने त्यांचे स्वागत होत आहे.
अलीकडेच नवी मुंबईत ‘काहीतरी कर नवी मुंबईकर’ ही लोकचळवळ अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वात गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. नवी मुंबईकरांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी त्यांनी दिघा ते नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा तब्बल २६ किलोमीटर पायी “क्रांती हक्क मोर्चा” काढला होता. तर, वास्तुविशारद आणि वकिलीचे पदवी घेतलेले शार्दूल कौशिक हे युवक काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. त्यांचे वडील अनिल कौशिक हे नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. शहरातील नागरी प्रश्नांसाठी ते नेहमीच आघाडीवर असतात.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे युवकांमध्ये मोठे वलय असून, त्याचा फायदा उचलण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षातील युवा ब्रिगेडला पुढे आणल्याची चर्चा आहे. म्हात्रे आणि कौशिक या दोघा युवा नेत्यांच्या निवडीनंतर नवी मुंबईत महाविकास आघाडीला बळ मिळणार, असल्याचा विश्वास घटक पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.