कल्याण पूर्व-पश्चिमसह ऐरोलीवरून 'मविआ'त बिघाडी, कॅाग्रेसची उद्धवसेनेकडे तीन जागांची मागणी
By नारायण जाधव | Published: October 6, 2024 05:28 PM2024-10-06T17:28:11+5:302024-10-06T17:28:50+5:30
दोन दिवसात मुंबईत जागा वाटपाचा फार्मुला
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघातील १८ विधानसभा मतदारसंघापैकी किमान तीन जागा काँग्रेसला सोडाव्यात, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या वरिष्ठांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासाठी काँग्रेसने नवी मुंबईतील आरोपींसह कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम आणि भिवंडीतील एका मतदारसंघावर दावा केला आहे.
मात्र, उद्धवसेनेदेखील या मतदार संघावर दावा केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. या पट्ट्यात काँग्रेसला एकही जागा मिळणार नसेल तर काँग्रेस ठाणे जिल्ह्यातून हद्दपार होईल, अशी भीती काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तळकोकण अर्थात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच ठाणे जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे या निकालाकडे लक्ष वेधून काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक येत्या एक दोन दिवसांत होणार आहे. या बैठकीत ऐरोलीसह कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम मतदारसंघावरून काँग्रेस आणि उद्धव सेनेच्या नेत्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता काँग्रेसच्या एका नेत्याने वर्तवली. कल्याण ग्रामीण मतदार संघात मनसेचा आमदार असल्यामुळे ही जागा उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढणार आहे. शिवसेनेचे डोंबिवलीतील नेते पुंडलिक म्हात्रे यांचे पुत्र दीपेश म्हात्रे उद्धव सेनेकडून इच्छुक आहेत. मुंब्रा - कळवा मतदारसंघात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आमदार असल्यामुळे तेच पुन्हा निवडणूक लढवतील.
अंबरनाथ तसेच कल्याण पश्चिम मतदार संघात शिंदे सेनेचे आमदार असल्यामुळे या दोन्ही जागा उद्धव सेना लढणार आहे. उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी हे शरद पवार गटाकडून तयारीत आहेत. काँग्रेसच्या दाव्यानुसार कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन जागा उद्धव सेना, दोन जागा शरद पवार गट लढणार असेल तर काँग्रेसने फक्त एका जागेवर समाधान मानावे का? असा प्रश्न पक्षाचे पदाधिकारी करीत आहेत.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन जागी शरद पवार गट तर दोन ठिकाणी उद्धवसेना आणि समाजवादी पार्टी बरोबर आघाडी असल्यामुळे काँग्रेसला भिवंडी पूर्वची जागा समाजवादी पार्टीला सोडावी लागेल, असे सांगण्यात येत आहे. समाजवादी पार्टीशी असलेली मैत्री बघता भिवंडी पूर्व ची जागा समाजवादी पार्टीला सोडावी लागेल आणि ही जागा काँग्रेसच्या कोट्यातील असेल. त्यामुळे काँग्रेसकडे एकमेव जागा लढण्याचा पर्याय शिल्लक राहतो.
भिवंडी ग्रामीण मध्ये शिवसेनेचा विद्यमान आमदार असल्यामुळे या जागेवर उद्धव सेनेने दावा केला आहे तर भिवंडी पश्चिमेत भाजपचा आमदार असल्यामुळे ही जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे.मुरबाड आणि शहापूर मध्ये कॅाग्रेस नाही. येथे भाजपा व राष्ट्रवादीच्या दोन गट आणि उद्धवसेनेत तणातणी आहे.
कल्याण पश्चिम मतदारसंघात दलित आणि मुस्लिम समाजाची निर्णायक मते आहेत. या दोन्ही समाजाने लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेचा सर्वाधिक फायदा महाविकास आघाडीला झाला आहे. या मतदारसंघात उपरे नव्हे तर स्थानिक नेते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ही जागाही काँग्रेसला सोडली तर ठाणे जिल्ह्यातून काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतील, यासाठी शिवसेनेने एक पाऊल मागे यावे अशी मागणी काँग्रेसचे नेते करत आहेत. मात्र ही जागा काँग्रेसच्या पदरात पडली नाही तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला काँग्रेसला एकही जागा लढता येणार नाही. त्याचा फटका येणाऱ्या महापालिका निवडणूक देखील बसू शकतो.
महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये सर्वसाधारण सूत्र असे ठरले आहे की प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना किमान एक तरी जागा त्यांच्या वाट्याला यावी. यासाठी प्रत्येक मतदार संघनिहाय चर्चा होत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसने ऐरोलीची जागा मागितली आहे. येथून युवककाँग्रेसचे अनिकेत म्हात्रेंनी तयारी चालविली आहे. गणेश नाईकांविरुद्ध लढण्याची तयारी त्यांनी केली आहे कल्याण पूर्वमध्ये गेल्या तीन निवडणुकीत बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला आहे.
सद्य परिस्थितीत कल्याण पूर्व मध्ये गणपत गायकवाड यांच्या बद्दल मतदारांमध्ये आणि भाजपमध्ये देखील नाराजी आहे. या संधीचा फायदा घेत महाविकास आघाडीने चर्चा करून आणि कुठलाही प्रतिष्ठेचा मुद्दा न करता ही जागा काँग्रेसला सोडली तर कल्याण पूर्व मधून काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकेल, असा दावा स्थानिक नेत्यांनी केला आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास स्थानिक, प्रामाणिक, शिक्षित, पक्षाशी एकनिष्ठ आणि मतदारांशी सतत संपर्क असलेला नेता इच्छुक आहेत.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना तीन आयात नेत्यांकडे उमेदवार म्हणून पाहते आहे. यातील महेश गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख असून यांच्यावरच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळी झाडली होती. अन्य दोन संभाव्य उमेदवारांमध्ये निलेश शिंदे आणि विशाल पावशे यांचे नाव घेतले जात आहे. काँग्रेसने दावा केला की उद्धव ठाकरे पक्ष सोडून गेलेल्यांचा उल्लेख गद्दार म्हणून करतात आणि अशा गद्दारांना पुन्हा पक्षात घेऊन उमेदवारी देणार असाल तर काँग्रेस या मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडीचे काम करणार नाही.
विधानसभा निवडणुकीत सांगली पॅटर्न होऊ देणार नाही महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही याची काळजी उद्धव ठाकरे यांनी घ्यावी अशा प्रतिक्रिया काँगेस पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात व्यक्त झाल्या. दोन दिवसात महाविकास आघाडीचे बैठक असून या बैठकीत काँग्रेसच्या मतदारसंघाचा तिढा सोडवा अन्यथा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा इशाराच नवी मुंबई व कल्याणमधील काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी दिला आहे.