उपमहापौरपदासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचीच कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 03:02 AM2017-11-07T03:02:42+5:302017-11-07T03:02:53+5:30

उपमहापौरपदाच्या निवडीवरून काँगे्रसमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी बंडखोरी केली आहे.

Congress District President's Test for Deputy Mayor | उपमहापौरपदासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचीच कसोटी

उपमहापौरपदासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचीच कसोटी

googlenewsNext

नवी मुंबई : उपमहापौरपदाच्या निवडीवरून काँगे्रसमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी बंडखोरी केली आहे. बंडखोर गटाने प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह माणिकराव जगताप यांचीही भेट घेवून आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढा वाचून शहरातील १० पैकी ७ नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
बेलापूर विधानसभा मतदार संघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. जनार्दन गौरी हे अनेक वर्षे या परिसराचे आमदार होते. बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये काँगे्रसची सत्ता होती. परंतु अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागल्यामुळे पक्षाची वाताहत सुरू झाली. पक्षांतर्गत गटबाजीमुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाची ताकद कमी होत आहे. लोकसभा व निधानसभा निवडणुकीतील पक्षाचा पराभव झाला. यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षाच्या सहा नगरसेवकांनी काँगे्रसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसची वाताहत होणार असे बोलले जात असताना जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे दहा नगरसेवक निवडून आले. यामध्ये भगत यांच्या कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला गृहीत धरले जात नव्हते तेच किंगमेकर ठरले व त्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. अविनाश लाड उपमहापौर झाले. पुढील दोन वर्षांमध्ये हेमांगी सोनावणे व अनिता पाटील यांना स्थायी समितीचे सभापतीपद मिळाले. महापौर व उपमहापौर निवडणुकीमध्ये जिल्हाअध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांचे नाव आघाडीवर होते. परंतु शेवटच्या क्षणी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती रमाकांत म्हात्रे यांच्या पत्नी मंदाकिनी म्हात्रे यांचे नाव जाहीर करण्यात आले. यामुळे भगत यांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केला आहे.
उपमहापौर पदासाठी काँगे्रसच्यावतीने मंदाकिनी म्हात्रे यांचा अधिकृत व वैजयंती भगत यांचा बंडखोर म्हणून अर्ज दाखल केला आहे. पक्षाचे निरीक्षक भाई जगताप यांनीही अर्ज भरल्यानंतर काँगे्रसमध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. यामुळे भगत यांनी बंडखोरी केली असली तरी ते माघार घेतील व निवडणुकीदिवशी पक्ष एक असल्याचे चित्र पाहावयास मिळेल असा दावा केला आहे. परंतु भगत यांनी मात्र पक्षश्रेष्ठी आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण व माणिकराव जगताप यांची भेट घेतली. जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर केलेल्या कामाची माहिती दिली. पक्षाच्या दहापैकी सात नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावाही केला असून संघटना वाढीसाठी एकदा संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रदेशाध्यक्ष कुणाला न्याय देणार?
उपमहापौरपदासाठी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांचे निकटवर्ती माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या पत्नी मंदाकिनी म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. म्हात्रे हे अनेक वर्षांपासून चव्हाण यांचे विश्वासू आहेत. उद्योगमंत्री, मुख्यमंत्री व प्रदेशअध्यक्ष या वाटीचालीमध्ये ते सोबत होते. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, निशांत भगत यांनीही प्रदेश अध्यक्षांची भेट घेतली. साहेब संघटना अडचणीत असताना आम्ही तन, मन धनाने अविश्रांत मेहनत घेतली. आंदोलने केली विविध कार्यक्रम राबविले. आम्ही कुठे कमी पडलो ते सांगा. आम्ही आतापर्यंत स्वत:साठी काहीच मागितले नाही. पहिल्यांदा उपमहापौरपद मागितले आहे. पक्षाच्या दहा पैकी सात नगरसेवकांचे हेच मत असून आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली असून प्रदेश अध्यक्ष विश्वासू कार्यकर्त्याला न्याय देणार की जिल्हा अध्यक्षांना हे पुढील दोन दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

Web Title: Congress District President's Test for Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.