योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्याचे निकालातून स्पष्ट झाल्यावर नवी मुंबईतील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल-ताशांच्या गजरावर गुलालाची उधळण करत फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
केंद्रातील हुकूमशाही सरकारला कर्नाटक राज्यातील नागरिकांनी धडा शिकवला असल्याचा टोला काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी लगावला. वाढत्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त झाली असून कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात देखील बदल घडेल असा विश्वास यावेळी कौशिक यांनी व्यक्त केला. माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्याना कर्नाटक राज्यातील जनतेने नाकारले असल्याची टीका केली. हुकूमशाहीची राजकारण चालणार नाही आणि हुकूमशाही जास्त काळ टिकू शकत नाही कर्नाटकातील जनतेने दाखवून दिल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते नासिर हुसेन म्हणाले. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर आता देशात देखील बदल घडेल आणि संपूर्ण देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास काँग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी सांगितले.
आनंदोत्सव साजरा करताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ढोल -ताश्याच्या गजरावर ठेका धरत गुलालाची उधळन केली, एकमेकांना पेढे भरवून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रमाकांत म्हात्रे, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे, काँग्रेसच्या पदाधिकारी सुदर्शना कौशिक, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे ओबीसी सेलचे विभाग अध्यक्ष संतोष सुतार, काँग्रेसच्या वाशी विभाग महिला अध्यक्षा माधुरी काळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.