ठाणे : मुंब्य्रात राष्ट्रवादीने काँग्रेसला जबरदस्त धक्का देऊन भविष्यात होणाऱ्या आघाडीत बिघाडी निर्माण केली असली तरी या धक्क्यातून सावरण्यासाठी सध्या काँग्रेसचे चिंतन सुरू झाले आहे. यानुसार, जशाला तसे उत्तर देण्याची तयारी करूनपक्षाने मुंब्य्रावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच कोणत्या प्रभागात काँग्रेस प्रबळ आहे, त्या ठिकाणी उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. तर, ज्या प्रभागात पक्ष पिछाडीवर आहे, त्याठिकाणी तो वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीने मुंब्य्रातील नगरसेवक राजन किणे यांना आपल्या पक्षात आणून काँग्रेसला जबर धक्का दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता आपले लक्ष कळवा आणि मुंब्य्रावरच अधिक केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. कळव्यातही राष्ट्रवादी प्रबळ असल्याने आता शिवसेनेचा येथील एक नगरसेवकही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादीला आता जशाला तसे उत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली असून मुंब्य्रातून पक्ष हद्दपार होऊ न देता तोवाढवण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. त्यानुसार, येत्या काही दिवसांत येथे मोठी सभा घेऊन त्याची चाचपणी केली जाणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे काही नाराज आपल्या पक्षात आणता येतील का, याचीही चाचपणी पक्षाकडून सुरू झाली आहे. तसेच शहरी भागातदेखील काँग्रेसने आता प्रत्येक प्रभागाचा अभ्यास सुरू केला असून कोणत्या प्रभागात पक्ष कितपत प्रभावी, याची आकडेमोड करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार, या प्रभागात ताकदीचा उमेदवार देण्यासाठीही येथील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. ज्या प्रभागात काँग्रेस प्रबळ नाही, त्या ठिकाणी ती कशी वाढवता येईल, याचाही अभ्यास सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी पक्षातील श्रेष्ठींना ४० जागा निवडून आणू, असा दावा केला आहे. परंतु, सध्याची पक्षाची परिस्थिती पाहता हे शक्य नाही, हे कदाचित त्यांनासुद्धा माहीत आहे. परंतु, असे असले तरीदेखील केवळ आपली कॉलर टाइट करण्याच्या तेनादात अडकले आहेत. (प्रतिनिधी)
काँग्रेसची नजर आता मुंब्य्रावर
By admin | Published: November 18, 2016 2:58 AM