नवी मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना झालेल्या त्रासाच्या विरोधात काँग्रेसतर्फे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन दोन टप्प्यात होणार असून त्यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी वाशी येथे पत्रकार परिषदेत दिली. तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँकांबाहेरच्या रांगेत ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांच्या मदतीचीही त्यांनी मागणी केली. केंद्र सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेवून दोन महिन्यांचा कालावधी होत आलेला आहे. परंतु अद्यापही पुरेशा सुट्या नोटा व नव्या नोटा उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तर घोषणेनंतर नोटा बदलीसाठी अथवा गरजेनुसार पैसे काढण्यासाठी बँका व एटीएम सेंटरच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगांमध्ये अनेकांचा बळी देखील गेलेला आहे. अशा बळींच्या कुटुंबीयांना किमान १० लाखांचा मदतनिधी शासनाने देण्याची गरज महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वसामान्यांना झालेल्या त्रासाच्या विरोधात काँग्रेसतर्फे आंदोलने केली जात आहेत. त्यानुसार नवी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी ते वाशीतील काँग्रेस भवनमध्ये उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, उपमहापौर अविनाश लाड, माजी महापौर चंदू राणे, सुरेश नायडू, पूजा धोत्रे आदी उपस्थित होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पैशांचा तुटवडा भासून शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत.
नोटाबंदीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
By admin | Published: January 03, 2017 5:46 AM