नवी मुबई : मराठवाड्यात दलित समाजाने राष्ट्रवादी-काँग्रेसकडे पाठ फिरवल्याचे मत राजकीय अभ्यासक डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले आहे. तर लोकसभेच्या १७ निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी समाजाचा संसदीय राजकारणातला प्रवास रोखल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील निवडणुकीचा आढावा घेताना डोंगरगावकर यांनी एका निवेदनाद्वारे हे राजकीय विश्लेषण केले आहे. काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मोठा पराभव पत्करावा लागला आहे. तर गत निवडणुकीत जिंकलेल्या दोनही जागा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना राखता आलेल्या नाहीत, त्यामुळे राज्यात काँग्रेस खऱ्या अर्थाने वंचित झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे मात्र एमआयएमने मराठवाड्यात औरंगाबादची जागा जिंकली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या नव्या पक्षाने केलेल्या युतीचे फळ एमआयएमला मिळाले आहे. त्यामुळे लोकसभेत खासदार असद्दुदीन ओवैसी यांना नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांची साथ मिळाली आहे. सध्या आगामी विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीला सोबत घ्यायचे की नाही, अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावेच असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये वाढू लागला आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जवळपास १५ जागांवर एकूण ४२ लाख मते मिळवली आहेत. या मतांचा प्रभाव विधानसभेच्या २८८ जागांवर राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे सात जागांवर काँग्रेसला, दोन जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तर एका जागेवर शिवसेनेला फटका बसला़ त्यावरून प्रकाश आंबेडकर यांच्या या नव्या पक्षाने लोकसभा निवडणकीत नऊ जागांवर तिसºया क्रमांकाची मते मिळवली असल्याचेही विश्लेषण डॉ. डोंगरगावकर यांनी केले आहे.
'काँग्रेस-राष्ट्रवादीकडे दलित समाजाने फिरवली पाठ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 2:03 AM