नवी मुंबई : भाजप सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे देश संकटात सापडला असून, अर्थव्यवस्था खालावली आहे. नवीन रोजगार ठप्प झाले असून, बेरोजगारी वाढली आहे आदी आरोप करीत सरकारविरोधात नवी मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून सीबीडीतील कोकण भवन कार्यालयावर शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी निदर्शने करण्यात आली.देशातील विविध प्रश्नांसह नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, मोठ्या प्रमाणावर बंद पडलेले एमआयडीसीतील उद्योग, प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न, शहरातील धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी आदी प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली कोकण भवन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. या वेळी भाजप शासनाच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. या वेळी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत, माजी उपमहापौर अविनाश लाड, प्रदेश प्रवक्त्या लीना लिमये, महिला अध्यक्षा उज्ज्वला साळवे, परिवहनचे माजी सभापती आबा दळवी, प्रशांत वाघ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:02 AM