नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा एक वर्षापासून सुरू आहे. महापौर निवडणुकीनंतर ते पक्षांतर करण्याची चर्चा असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाईकच राष्ट्रवादीमध्ये राहणार का याविषयी संभ्रम असल्याने महापौर निवडणुकीमध्ये त्यांच्याशी आघाडी का करायची, असा प्रश्न एका गटाने उपस्थित केला असून, शिवसेनेबरोबर जाण्याचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले आहे.महापौरपदाची निवडणूक काही दिवसांवर आली असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौरपद टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक स्वत: स्वपक्षातील व आघाडीच्या सदस्यांशी संवाद साधत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारही काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेने पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट निर्माण करायची व काँगे्रसच्या मदतीने महापौरपद मिळवायची रणनीती आखली आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची दहा मते निर्णायक राहणार आहेत. यामुळे काँगे्रस नगरसेवकांचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनी पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय अंतिम असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु पक्षात पाठिंब्यावरून दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. एक गट राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या भूमिकेवर ठाम असून दुसºया गटाने पक्षाच्या हितासाठी व राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेबरोबर जाणे योग्य राहील असे मत व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे स्वत:च भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात होत आहे. महापौर निवडणुकीनंतर याविषयी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नाईकच राष्ट्रवादीमध्ये राहणार नसतील तर आघाडी धर्म पाळण्याची जबाबदारी फक्त काँगे्रसनेच का घ्यावी अशी भूमिका घेतली जात आहे.माजी मंत्री गणेश नाईक भाजपामध्ये जाण्याच्या चर्चा वारंवार होत आहेत. प्रसारमाध्यमांमधून याविषयी अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध झाले. प्रत्यक्ष नाईक किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीच या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही किंवा या वृत्ताचे खंडनही केलेले नाही. पक्षांतराविषयी मौन बाळगल्यामुळे ते महापौर निवडणुकीनंतर भाजपात जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीनंतर नाईकांनी ‘नमो’मिलन केलेच तर काँगे्रसची फरफट होईल अशी भूमिका व्यक्त केली जात आहे. यामुळे काँगे्रसने राष्ट्रवादी नेत्यांच्या मागे धावण्यापेक्षा शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी भूमिका व्यक्त केली जात असून यावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार यावर महापौर कोणाचा हे निश्चित होणार आहे.निवडणुकीसाठी घोडेबाजार सुरूमहापौर निवडणुकीमध्ये प्रत्येक मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने काँगे्रस, राष्ट्रवादीसह अपक्ष नगरसेवक फोडण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीनेही कोणताही गाजावाजा न करता वेळ पडली तर विरोधी पक्षात फूट पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नगरसेवक फोडण्यासाठी पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. फुटीचा फटका बसू नये यासाठी राष्ट्रवादीने त्यांचे काही नगरसेवक अज्ञातवासामध्ये पाठविले आहेत.शिवसेना नगरसेवकही शहराबाहेर पाठविण्यात आले आहेत. नक्की कोणत्या पक्षात फूट पडणार हे निवडणुकीदिवशीच समजणार असून सर्वांचे लक्ष काँगे्रसच्या भूमिकेवर लागले आहे. काँगे्रसच्या नगरसेवकांना शिवसेनेने मोठी आॅफर दिल्याची चर्चा असून दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही वरिष्ठ पातळीवर सर्वांना मॅनेज करण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. काँगे्रसचे नगरसेवक त्यांची मते विकणार का याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.शिवसेनेलापाठिंब्याचीही शक्यतानवी मुंबईमध्ये यापूर्वी स्थायी समिती निवडणुकीमध्ये काँगे्रसच्या मीरा पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा देवून राष्ट्रवादीला धक्का दिला होता. याशिवाय राज्यात भिवंडी, परभणी व मालेगावमध्येही शिवसेना व काँगे्रस यांच्यामध्ये युती आहे. नवी मुंबईमध्येही पालिकेच्या स्थापनेपासून सत्तेवर असलेल्या नाईकांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे मत एका गटाकडून व्यक्त केले जात आहे.काँगे्रस श्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्षकाँगे्रसमध्ये पाठिंब्यावरून द्विधा मन:स्थिती आहे. सहा नगरसेवक राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका मांडत आहेत. चार जणांनी शिवसेनेबरोबर जावे अशी भूमिका खासगीत व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेबरोबर जाणाºयांचा आकडा वाढूही शकतो. पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार व पक्षातील फूट टाळून मतांची फाटाफूट कशी टाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाईकांच्या ‘नमो’मिलनाच्या शक्यतेने कॉंग्रेसवासी अस्वस्थ; महापौर निवडणुकीत आघाडीत बिघाडी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 5:49 AM