तळोजा सीईटीपी रस्त्याचे काँक्रिटीकरण, १६ कोटींचा खर्च अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:00 AM2019-05-30T00:00:02+5:302019-05-30T00:00:08+5:30
कळंबोली : कळंबोलीतून तळोजा एमआयडीसीकडे जाणाऱ्या सीईटीपी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्यावर सिडकोने रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला मंजुरी ...
कळंबोली : कळंबोलीतून तळोजा एमआयडीसीकडे जाणाऱ्या सीईटीपी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्यावर सिडकोने रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला मंजुरी दिली आहे. यासाठी १६ कोटींचा खर्च अपेक्षित असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात होणार आहे.
कळंबोलीतून थेट तळोजा एमआयडीसीत जाता यावे, या उद्देशाने सिडकोने रोडपाली सिग्नलपासून ते पुढे दिवा-पनवेल रेल्वेमार्गावरून उड्डाणपूल बांधला. फुडलॅण्ड कंपनीपासून हा पूल सुरू होतो, त्यामुळे नावडे पुलावरील वाहतूक काही प्रमाणात वळाली आहे. त्याचबरोबर पनवेल-मुंब्रा महामार्गावरील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी झाली. तीन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
तळोजा बाजूने पुलापासून ते सीईटीपीकडे जाणाºया मार्गाची सध्या दैना झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकीचे अपघात होत असून चारचाकी वाहनेही खड्ड्यांमुळे आपटत आहेत.
रस्त्यामुळे वाहनांच्या नुकसानाच्या अनेक तक्रारी वर्षभर सिडकोकडे आल्या आहेत. याबाबत कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणावरे यांनीही पाठपुरावा केला. त्यानुसार सिडकोने रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव तयार केला.
पनवेल तसेच कळंबोलीतून येणाºयासाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी
यांनी सांगितले.