पनवेलमध्ये होणार रेल्वे डब्यांची जोडणी अन् दुरूस्ती, कोच यार्डचा वनवास संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 09:36 AM2023-04-06T09:36:45+5:302023-04-06T09:37:04+5:30

सिडको मध्य रेल्वेसोबत करणार भागीदारी

Connection and repair of railway coaches will be done in Panvel, exile of coach yard will end | पनवेलमध्ये होणार रेल्वे डब्यांची जोडणी अन् दुरूस्ती, कोच यार्डचा वनवास संपणार

पनवेलमध्ये होणार रेल्वे डब्यांची जोडणी अन् दुरूस्ती, कोच यार्डचा वनवास संपणार

googlenewsNext

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मध्य रेल्वे आणि सिडकोच्या संयुक्त भागीदारीतून पनवेलरेल्वेस्थानकाच्या परिसरात कोचिंग कॉम्प्लेक्स अर्थात, रेल्वेचा कोच यार्ड तयार केला जाणार आहे.  २०१२  मध्ये प्रस्तावित केलेल्या या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय सिडकोचे  व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी घेतला आहे. मध्य रेल्वेने पनवेल येथे कोचिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेतला असून या कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये रेल्वेचे कोच अर्थात डब्यांची जोडणी आणि दुरूस्ती केली जाणार आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह विविध प्रकल्पांमुळे पनवेल शहराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. भविष्यात मुंबईनंतर पनवेल हेच राज्याचे आर्थिक केंद्र होईल, असे भाकीत केले जात आहे. कारण सध्या या क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. दळणवळणाच्या अद्ययावत यंत्रणा उपलब्ध केल्या जात आहेत.

मुंबईच्या दुप्पट क्षेत्रफळ असलेल्या नैना प्रकल्पाचा विकास दृष्टिपथात आला आहे. कोकण रेल्वे कॉरिडोरला पनवेल स्थानकात थांबा आहे. या स्थानकात पाच वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या थांबतात. रस्ते आणि उपनगरीय गाड्यांनी पनवेल स्थानकाला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. पनवेल-कर्जत मार्गाचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे पनवेल स्थानक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून पुढे येत आहे. 

पॅसेंजर टर्मिनसचा होणार विकास

सध्या कार्यरत असलेल्या येथील पॅसेंजर टर्मिनसचा विकास करण्याचेही प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी कळंबोली येथे सुविधा केंद्र विकसित केले जाणार आहे. रेल्वे आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीतून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी सिडको ६७ टक्के, तर रेल्वे ३३ टक्के निधी खर्च करणार आहे. त्यानुसार, चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात सिडकोने या प्रकल्पासाठी २३ कोटींचा निधी आरक्षित केला आहे.

नवी मुंबईतील प्रवाशांची गैरसोय होणार दूर

देशाच्या विविध भागांत जाणाऱ्या बहुतांशी लांब पल्ल्यांच्या गाड्या मुंबईतील सीएसएमटी, कुर्ला आणि बांद्रा येथून सुटतात. रायगड आणि नवी मुंबईतील प्रवाशांना वाहतूककोंडीतून मार्ग काढत, या गाड्या पकडण्यासाठी मुंबईला जावे लागते. रेल्वेच्या नवीन कोचिंग संकुलामुळे या विभागातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. कारण भविष्यात पनवेल स्थानकातूनच विविध मार्गांवरील लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार आहेत.

Web Title: Connection and repair of railway coaches will be done in Panvel, exile of coach yard will end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.