सिडकोची अग्निशमन खर्चात कंजुषी

By Admin | Published: January 30, 2016 02:34 AM2016-01-30T02:34:55+5:302016-01-30T02:34:55+5:30

खारघरमध्ये लागलेल्या आगीमुळे सिडकोचा स्मार्ट सिटीचा फुगा फुटला आहे. साऊथ नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये २४ मजली इमारती बांधण्यासाठी परवानगी दिली जात आहे. परंतु सिडकोकडे

Considering the cost savings of CIDCO | सिडकोची अग्निशमन खर्चात कंजुषी

सिडकोची अग्निशमन खर्चात कंजुषी

googlenewsNext

- नामदेव मोरे,  नवी मुुंबई
खारघरमध्ये लागलेल्या आगीमुळे सिडकोचा स्मार्ट सिटीचा फुगा फुटला आहे. साऊथ नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये २४ मजली इमारती बांधण्यासाठी परवानगी दिली जात आहे. परंतु सिडकोकडे ८ ते १० मजल्यापर्यंतच आग विझविण्याची यंत्रणा असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मार्ट सिटीसाठी ३४,७७७ कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा करणारी ही संस्था अग्निशमन दल सक्षम करण्याकडे दुर्लक्ष करत आहे.
शहराचे शिल्पकार म्हणून सिडको स्वत:चा उल्लेख करत असते. नवी मुुंबई हे सुनियोजित शहर वसविले व आता साऊथ नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी उभारण्याचा संकल्प केला आहे. या परिसरात तब्बल ५३,२४४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामधील ३४,७७७ कोटी स्वत: सिडको खर्च करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र या परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक सुविधाही मिळत नाहीत.
खारघर ते कळंबोली, पनवेलपर्यंत सिडकोने २४ मजली इमारती बांधण्याची परवानगी दिली जात आहे. परंतु या इमारतींमध्ये आग लागली तर ती विझविण्यासाठीची यंत्रणाच उभारलेली नाही. सिडकोकडे कागदावर १२ माळ्यापर्यंत आग विझविण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध आहे. परंतु प्रत्यक्षात ८ ते १० मजल्यापर्यंतचीच आग विझविता येते. गिरीराज होरीझोन टॉवरमधील १५ मजल्यावर बुधवारी रात्री आग लागली. आग विझविताना सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागली. अखेर नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाची ब्रँटो लिफ्ट आल्यानंतर आग नियंत्रणात आली.
सिडको अग्निशमन दलामध्ये काम करणारे जवान जीव धोक्यात घालून आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना अद्ययावत आग विझविणारी वाहने व इतर उपकरणे उपलब्ध करून दिली जात नाहीत. सिडकोची तीन अग्निशमन केंद्रे असून त्यामधील एकाही ठिकाणी ब्रँटो स्काय लिफ्ट नाही. तीन महिन्यांपूर्वी नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. या कर्मचाऱ्यांना गणवेश, गमबूट, हातमोजे, फायरप्रूप जॅकेट या सुविधा दिलेल्या नाहीत. अनेक कर्मचाऱ्यांचा अपघात विमाही उतरविलेला नाही. सिडकोकडील वाहनांचा वापर करून ८ ते १० मजल्यांच्या वरील आग विझविता येत नाही. यामुळे पूर्णपणे इतर अग्निशमन दलाच्या मदतीवर विसंबून राहावे लागत आहे. ज्या ठिकाणी आग लागली तेथील नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. वास्तविक आग विझविण्याची यंत्रणा असेल तेवढ्याची उंचीएवढे बांधकाम करण्याची परवानगी दिली पाहिजे. परंतु सिडको क्षमतेपेक्षा दुप्पट उंचीच्या इमारती बांधण्यासाठी परवानगी देत आहे. तेथील रहिवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असून आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनाही जीव धोक्यात घालावा लागत आहे.

अग्निशमनसाठी फक्त २० कोटी
सिडकोने साऊथ नवी मुंबई ही पहिली स्मार्ट सिटी बनविण्यासाठी पुढील पाच वर्षात स्वत:च्या गंगाजळीतून ३४,७७७ कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प केला आहे. परंतु दुसरीकडे अग्निशमन दलावर खर्च करताना मात्र प्रचंड कंजुषी केली जात आहे. गतवर्षी अर्थसंकल्पात फक्त २० कोटी रुपयांची तरतूद केली होती. पुढील वर्षी २५ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. आग विझविण्यासाठीची यंत्रणा नसेल तर या शहराला स्मार्ट सिटी कसे म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सिडकोच्या तातडीच्या बैठका
खारघरमधील गिरीराज होरीझोन इमारतीमध्ये काही वरिष्ठ सनदी अधिकारीही राहतात. आग विझविण्यासाठी सिडकोची यंत्रणा अपुरी असल्यामुळे त्यांनी वरिष्ठ व्यवस्थापनाकडे नाराजी व्यक्त केली. यामुळे दोन दिवस सिडको प्रशासन व अग्निशमन अधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे गणवेष,गमबूट व इतर प्रश्न तत्काळ सोडविण्याचे निश्चित केले आहे. ब्रँटो स्काय लिफ्टही खरेदी केली जाणार आहे. परंतु ती प्रत्यक्षात अग्निशमन दलामध्ये येण्यासाठी अजून ७ ते ८ महिने लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कळंबोलीमधील वकार महामंडळाच्या गोडावूनला १९ सप्टेंबर २००५ मध्ये आग लागली होती. बाहेर उभे राहून आगीवर पाण्याचे फवारे मारता येत नव्हते. यामुळे जवानांनी इमारतीमध्ये प्रवेश केला. तेव्हा भिंत कोसळून सिडको अग्निशमन दलाचा जवान टी. आर. घरत याचा मृत्यू झाला. या घटनेला दहा वर्षे झाल्यानंतरही सिडकोने अत्याधुनिक वाहने खरेदी केली नाहीत. कर्मचाऱ्यांना फायर प्रूप जॅकेट, गमबूट, गणवेश व इतर आवश्यक सामग्री दिलेली नाही. घरत यांच्या स्मरणार्थ कळंबोली अग्निशमन दलाच्या आवारात शहीद स्मारक उभारले, परंतु पुन्हा कोणत्याही जवानावर अशी वेळ येवू नये यासाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

Web Title: Considering the cost savings of CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.