गोवानिर्मित मद्याची मुंबईत जाणारी ७८ लाखांची खेप तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ जप्त
By नारायण जाधव | Published: September 4, 2023 08:55 PM2023-09-04T20:55:21+5:302023-09-04T20:55:29+5:30
गोविंदाच्या उत्सवात अनेक मंडळांचे कार्यकर्तेे मद्य प्राशन केलेले असतात.
नवी मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोव्याहून मुंबईत जाणार्या मद्याची मोठी खेप जप्त केली आहे. यात महाराष्ट्रात बंदी असलेल्या विविध ब्रँडच्या भारतीय बनावटीचे विदेशी मद्याच्या ९१८ बॉक्सचा समावेश आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किमंत ७८ लाख ८ हजार ८४० रुपये आहे. यात बेकायदा मद्य, ट्रक आणि तीन मोबाइलचा समावेश आहे.
मद्याचा हा साठा गोव्यातून मुंबईच्या दिशेने नेण्यात येणार होता. या प्रकरणी तेरसिंग धनसिंग कनोजे, (चालक) नासीर अन्वर शेख आणि गुड्डू देवसिंग रावत यांना अटक केली आहे. नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ ही कारवाई करण्यात आली.
गोविंदाच्या उत्सवात अनेक मंडळांचे कार्यकर्तेे मद्य प्राशन केलेले असतात. यामुळे मुंबईतील एखाद्या मंडळाने हा साठा तर मागिवला नव्हता ना, यासह हा साठा कोणी मागविला होता, तो मुंबईत कोणत्या ठिकाणी नेण्यात येत होता, याबाबतचा तपास उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
चेक पोस्टच्या नजरेतून कसा सुटला
ट्रकमधून आणण्यात येणारा हा विदेशी मद्याच्या ९१८ बॉक्सचा साठा महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरील चेक पोस्टच्या नजरेतून कसा काय सुटला, कोणत्या वेळी तो चेकपोस्टवर आला होता, त्यावेळी चेक पोस्टवर ड्युटीवर होते, यास गोव्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी आणखी कोणता खुष्कीचा मार्ग तर नाही ना या अंगानेही तपास करण्यात येत आहे.