मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:07 AM2020-08-27T00:07:17+5:302020-08-27T00:07:25+5:30
वेतनातील तफावत दूर होणार: महापालिका आयुक्तांनी दिले संकेत
नवी मुंबई : कोरोना काळात अतिरिक्त मनुष्यबळासाठी महापालिकेने आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती प्रकिया सुरू केली होती. या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन आणि गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागात ठोक मानधन आणि कंत्राटी पद्धतीवर काम करणाºया कर्मचाºयांना देण्यात येणारे मानधन, यामध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत दूर करून ठोक मानधनावरील कर्मचाºयांनाही यथोचित न्याय देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या संदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांत गेल्या अनेक वर्षांपासून ठोक मानधनावर (करार पद्धतीवर) अनेक कर्मचारी काम करत आहेत. आरोग्य विभागात काम करणाºया कर्मचाºयांची कोरोना कालावधीमध्येही सेवा अविरतपणे सुरूच आहे, परंतु त्यांना मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. एकाच स्वरूपाचे काम करणाºया कर्मचाºयांच्या वेतनातील तफावत दूर करून, त्यांना न्याय देण्याची मागणी श्रमिक सेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. श्रमिक सेनेचे अध्यक्ष खासदार संजीव नाईक यांच्या सूचनेनुसार, भाजपचे पदाधिकारी राहुल शिंदे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन याबाबत निवेदनही दिले होते. महापालिका आयुक्तांनी याबाबत सकारात्मकता दाखवत, ज्या पदांची कोरोना काळासाठी नव्याने भरती करण्यात येत आहे, त्या पदांची कामे करणाºया आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्सेस आदी सर्वच कर्मचाºयांचे वेतन वाढविण्यात येणार असल्याचे आश्वासित केले होते. त्यानंतर, या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. सदर काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून आरोग्य विभागात ठोक मानधनावर काम करणाºया कर्मचाºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.