पनवेल : पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे व सत्ताधारी भाजपा यांच्यातील शीतयुद्धाने आता वेगळेच वळण घेतले आहे. भाजपाने आयुक्त शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती देऊन लवकरच विशेष सभा बोलावली जाणार असल्याचे सांगितले.प्रशासनाने मांडलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीत सभा बोलावण्यात आली होती. चर्चा करताना प्रशासनाच्या प्रतिनिधींना अर्थसंकल्पावर माहिती विचारली. मात्र प्रशासनाकडून योग्य माहिती मिळत नसल्याने सत्ताधारी भाजपाने अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. अर्थसंकल्पाचा ५१६ कोटींचा आकडा फसवा असल्याचा आरोप भाजपामार्फत करण्यात आला. स्थायी समितीची सभा गुरु वारपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय सभापती अमर पाटील यांनी घेतला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी आयुक्तांवर आरोप करीत त्यांच्याविरोधात विशेष सभा घेऊन अविश्वासाचा ठराव आणणार असल्याची माहिती दिली.सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वच्छ सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. तसेच अर्थसंकल्पात मालमत्ता कराची १०० कोटी अंदाजे रक्कम पकडण्यात आली आहे. मात्र यासंदर्भात नेमकी माहिती प्रशासनाकडे नसल्याने १०० कोटींचा मालमत्ता कर वसूल होणे कठीण असल्याचे सांगितले. नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी देखील आयुक्तांवर गंभीर आरोप केले. यावेळी स्थायी समिती सभापती अमर पाटील, नीलेश बाविस्कर, अनिल भगत, मनोज भुजबळ, मनोहर म्हात्रे उपस्थित होते.मात्र आयुक्तांच्या समर्थनार्थ विविध संघटना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्ष शेकाप महाआघाडी या अविश्वास ठरावाला विरोध करणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्तांविरोधात भाजपा आणणार अविश्वास ठराव, अर्थसंकल्पातील आकडेवारी फसवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:47 AM