ठरावीक दुकानातूनच बिन्स खरेदीची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:58 AM2018-02-24T00:58:18+5:302018-02-24T00:58:18+5:30
स्वच्छता अभियानाच्या नावाखाली व्यावसायिकांना ठरावीक दुकानातूनच बिन्स खरेदीला भाग पाडले जात असल्याचा प्रकार शहरात सुरू आहे.
नवी मुंबई : स्वच्छता अभियानाच्या नावाखाली व्यावसायिकांना ठरावीक दुकानातूनच बिन्स खरेदीला भाग पाडले जात असल्याचा प्रकार शहरात सुरू आहे. पालिकेच्या कर्मचाºयांकडून सर्वेक्षणाच्या नावाखाली प्रत्येक दुकानात जाऊन सक्तीने बिन्स खरेदीच्या बिलाच्या पावत्या फाडल्या जात आहेत. या प्रकारातून व्यावसायिकांची लूट होत असून, त्यामध्ये पालिका अधिकाºयांचेही लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
काही महिन्यांपासून शहरात मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान राबवले जात आहे. स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबई देशात अव्वल ठरावी, याकरिता सर्व प्रकारच्या शक्कल लढवल्या जात आहेत. त्यानुसार शहरातील रस्त्यालगतच्या भिंती, पदपथ रंगवण्यात आल्या आहेत. शिवाय, नागरिकांना कचराकुंडीतच कचरा टाकण्याचा सल्ला देत ओला व सुका वर्गीकरणाचे महत्त्व पटवून कचºयाच्या वर्गीकरणावरही भर दिला जात आहे. त्याकरिता पालिका अधिकाºयांकडून रहिवासी सोसायट्यांसह व्यावसायिकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. मात्र, यामध्ये ठरावीक बिन्स विक्रेत्यांसोबत साटेलोटे करून व्यावसायिकांना त्याच ठिकाणावरून बिन्स खरेदीला भाग पाडले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. स्वच्छता विभागातील कर्मचाºयांकडून सर्वेक्षणाच्या नावाखाली छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडे बिन्स आहेत का? याची पाहणी केली जात आहे. या दरम्यान ज्यांच्याकडे छोट्या बिन्स आहेत, अथवा ज्यांच्याकडे बिन्सच नाहीत, अशा सर्वांच्या माथी मोठ्या बिन्स मारल्या जात आहेत. याकरिता पालिकेचे कर्मचारी स्वत:सोबतच तुर्भे जनता मार्केट येथील राजेश्वर ट्रेडिंग कंपनीचे बिलबुक बाळगत आहेत. गरजेनुसार आवश्यक आकाराचे स्वत: बिन्स खरेदी करतो, असे व्यावसायिकांनी सांगितल्यानंतरही त्यांना सरसकट मोठ्या बिन्सची सक्ती होत आहे. त्यानुसार एका बिन्सचे ३०० रुपयेप्रमाणे दोन बिन्सचे ६०० रुपये उकळल्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्यापर्यंत बिन्स पोहोचवल्या जात आहेत.
या प्रकारामुळे घणसोली, कोपरखैरणे, एपीएमसीसह इतर अनेक ठिकाणच्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडे केवळ तुर्भे जनता मार्केटमधील त्या एकाच दुकानातून बिन्स खरेदी केल्याच्या पावत्या पाहायला मिळत आहेत. शहरात इतरही अनेक ठिकाणी छोटे-मोठे बिन्स विक्रेते असतानाही केवळ तुर्भेतील राजेश्वर ट्रेडिंगमधूनच बिन्स खरेदीची सक्ती का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे सेक्टर १५मध्ये काही जण सोबतच बिन्स घेऊन फिरून ते सरसकट दुकानदारांच्या माथी मारत होते, असा व्यावसायिकांचा आरोप आहे. त्यामध्ये काही सलून व्यावसायिकांनाही आवश्यकता नसतानाही मोठे बिन्स विकण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना एकाच विक्रेत्याकडून बिन्स खरेदीची सक्ती करण्यामागे अधिकाºयांचेही ‘अर्थ’कारण असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, या प्रकारातून होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीचा संताप शहरातील व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.