नवी मुंबई : अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घणसोली गाव व ऐरोली परिसरातील ही बांधकामे आहेत. त्यांच्याविरोधात महापालिका अतिक्रमण विभागाच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढतच चालले असून त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. पालिकेकडून बांधकाम थांबवण्याच्या नोटिसा बजावून देखील संबंधितांकडून प्रतिसाद मिळत नाही. पर्यायी अशांविरोधात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे पाऊल पालिकेकडून उचलले जात आहे. त्यानुसार दोन दिवसांत रबाळे पोलीस ठाण्यात चौघांविरोधात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घणसोली गावातील शिवाजी तलावालगतच्या गणपती कारखान्याजवळ अनधिकृतपणे घराचे बांधकाम सुरू होते. याप्रकरणी मोरेश्वर श्रीधर म्हात्रे यांना पालिकेने नोटीस बजावली होती. परंतु त्यानंतरही विनापरवाना बांधकाम सुरूच ठेवल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्यांच्याविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर १ येथे मोजीन कल्याणकर, राजेंद्र सूर्यवंशी तर सेक्टर २ मध्ये संजय लाड यांनी पालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करण्यास सुरुवात केलेली. त्यापैकी लाड यांनी त्यांच्या रो हाउसच्या लगतची मोकळी जागा बळकावून त्यावरही अतिक्रमण केले होते. यानुसार त्यांच्याविरोधात देखील ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अवैध बांधकामप्रकरणी चौघांवर गुन्हा, नोटीस बजावूनही बांधकाम होते सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 11:51 PM