- कमलाकर कांबळे नवी मुंबई : कोरोना वायरसमुळे उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. याचा सर्वाधिक फटका रियल इस्टेट क्षेत्राला बसला आहे. एकट्या मुंबई प्रादेशिक क्षेत्रात (एमएमआर) हजारो कोटींच्या बांधकाम प्रकल्पांना खीळ बसली आहे. असे असले तरी लॉकडाउननंतर पुढील वर्षभरात बांधकाम व्यवसाय पूर्वपदावर येईल, असा विश्वास ६0 टक्के विकासकांनी व्यक्त केला आहे.
कोरोनामुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत रियल इस्टेटचे भवितव्य काय असेल, यासंदर्भात क्रेडाई-एमसीएचआयच्या वतीने अलीकडेच सर्व्हे करण्यात आला. याअंतर्गत ५00 विकासकांना लॉकडाउननंतर रियल इस्टेटसमोर काय आवाहने असतील, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच संबंधित विषयाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न विकासकांना विचारण्यात आले होते. त्याद्वारे एक रिसर्च रिपोर्ट तयार करण्यात आला असून यात बहुतांशी विकासक आपल्या व्यवसायाविषयी आशावादी असल्याचे दिसून आले आहे.
लॉकडाउननंतर पुढील ९ ते १२ महिन्यांत रियल इस्टेटमधील व्यवहार पूर्वपदावर येतील, असा विश्वास ६0 टक्के विकासकांनी व्यक्त केला आहे. तर लॉकडाउननंतर सहा महिन्यांत परिस्थिती नॉर्मल होईल, असे ३0 टक्के विकासकांना वाटते आहे. नोटाबंदी, महारेरा व जीएसटीमुळे मागील तीन वर्षांपासून रियल इस्टेटला मंदीच्या झळा बसत आहेत. यातच आता कोरोनाचे संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीतही ८३ टक्के विकासकांनी याच व्यवसायात टिकून राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे अशा कठीण परिस्थितीतसुद्धा सुमारे ५0 टक्के विकासकांनी २0२१ पर्यंत नवीन प्रकल्प सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर काहींनी सुरू असलेले आपले जुने प्रकल्प लॉकडाउननंतर युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
कोरोना संसर्गामुळे मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. त्यामुळे भविष्यात बांधकाम प्रकल्पांना मजुरांची कमतरता भासणार आहे. परंतु अशा स्थितीतसुद्धा मजुरांची जुळवाजुळव करून प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार विकासकांनी व्यक्त केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर परिस्थितीशी जुळवून घेत ९५ टक्के विकासकांनी बांधकाम व्यवसायाला जोडून अत्यावश्यक सेवा क्षेत्र, मनोरंजन किंवा तत्सम क्षेत्रात प्रवेश करण्याची गरज व्यक्त केल्याचे क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष नयन शहा यांनी स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे रायगड जिल्हा विकासाच्या टप्प्यात आला आहे. विमानतळाच्या अनुषंगाने विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. पनवेल विकासचे केंद्रबिंदू बनले आहे. पनवेल परिसरात आजमितीस मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. लॉकडाउनमुळे हे प्रकल्प ठप्प झाले आहेत. सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यास पुढील काही महिन्यांत परिस्थितीत पूर्वपदावर येईल.- राजेश प्रजापती, संस्थापक अध्यक्ष, क्रेडाई-एमसीएचआय, रायगड युनिट
च्मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रात क्रेडाई-एमसीएचआयचे १६५७ सदस्य आहेत. त्यापैकी ५00 सदस्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. लॉकडाउननंतर बांधकाम व्यवसायाशी संबंधित धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीने यात सहा प्रश्न विचारण्यात आले होते.च्आर्थिक संकटावर मात करणे, मार्केटिंगचे स्वरूप, मालमत्ता विक्रीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण, ग्राहक आणि गुंतवणूकदार, मजूर व कार्यालयीन कर्मचाऱ्यांबाबतचे धोरण, बांधकाम प्रकल्पाशी संबंधित विविध घटकांबाबतची भूमिका आदीसंदर्भात ठोस धोरण या अहवालातून प्रस्तावित करण्यात आले आहे.