चोरीच्या आरोपावरून बांधकाम व्यावसायीकाचे अपहरण; लाकडी दांडक्याने मारहाण
By नामदेव मोरे | Published: December 29, 2023 02:20 PM2023-12-29T14:20:04+5:302023-12-29T14:22:10+5:30
गुजरातमध्ये नेवून गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव
नवी मुंबई : ऐरोलीमधील बांधकाम व्यावसायीक खिमजी चौधरी यांचे चोरीच्या आरोपावरून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोधरी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली व चोरी झालेले दागिने व पैसे देण्याची मागणी केली. या प्रकरणी सहा जणांविरोधात अपहरण व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अपहरण झालेल्या चौधरी यांच्या पत्नीचा भागीदारीमध्ये साडीचा व्यवसाय आहे. भागीदार महिलेच्या गुजरातमधील घरी १० लाख ६० हजार रुपयांची चोरी झाल्याचा गुन्हा तेथील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. या चोरीच्या संशयावरून चौधरी यांचे २५ डिसेंबरला ऐरोली सेक्टर १६ मधून अपहरण केले. तू गुजरातमध्ये चोरी केली असून पैसे व दागिने परत कर अशी मागणी केली. त्यांना घेवून महापे एमआयडीसीमध्ये नेले.
मारहाण करून गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव आणला. तेथून भुज जिल्ह्यातील कानपर गावातील मंदिरात नेवून तेथे देवळात देव अंगात आणण्याचा प्रयत्न केला. व नंतर त्यांना सोडून देण्यात आले. या प्रकरणी रबाळे पोलीस स्टेशनमध्ये कांता, मांजीनाथ, किरण, जयसुख, कल्पेश व अजून एक जणाविरोधात अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.