घरकूल योजनेतील बांधकाम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:41 AM2019-08-10T00:41:34+5:302019-08-10T00:41:44+5:30
वर्षभरात घरांना गळती, छप्पर उडाले : दोघे जखमी; खारघरमधील फणसवाडीतील दुर्घटना
पनवेल : खारघर शहरातील फणसवाडी या आदिवासीवाडीत शुक्रवारी एका घराचे छप्पर उडून ते दोन घरांवर पडल्याने या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले. एका घरातील संपूर्ण छप्पर खाली कोसळल्याने संसार उघड्यावर आला आहे. ९ आॅगस्ट, या जागतिक आदिवासीदिनीच ही घटना घडल्याने खारघरमधील आदिवासी बांधवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
खारघर हिलवर चाफेवाडी व फणसवाडी या दोन आदिवासी वाड्या आहेत. यापैकी सर्वात उंचावर असलेल्या फणसवाडीत ही घटना घडली. जेमतेम ३० ते ३५ घरांच्या या वाडीत तीन वर्षांपूर्वी खारघर ग्रामपंचायतींनी घरकूल योजनेअंतर्गत घरे बांधून दिली. मात्र, बांधकामानंतर वर्षभरातच घरांना गळती लागली. त्याच्यावर उपाय म्हणून खारघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुन्हा त्या घरावर एक मजला चढवून त्याच्यावर पत्रे टाकण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची प्रचिती शुक्रवारच्या घटनेत आली. सुनील हिरा मधे यांच्या घराचे पत्रे उडून थेट हौसा नामदेव गिरा व बाळाराम पारधी यांच्या घराजवळ पडले. सकाळी ८.१५ च्या दरम्यान घटना घडली. यात बाळाराम पारधी (२८) सुनील पारधी (२५) हे दोघे किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच प्रभाग अ समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांना घटनेची माहिती दिली. पाटील यांनी दुर्घटनाग्रस्त घरांचा आढावा घेत पंचनामा करून महसूल विभागातील तलाठ्यांना याबाबत माहिती दिली. घरकूल योजनेअंतर्गत दोन्ही आदिवासी पाड्यांमध्ये उभारण्यात आलेल्या घरांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. अनेक घरांना खिडक्या, दरवाजे नाहीत तर अनेक घरांना अद्यापही प्लॅस्टरही करण्यात आलेले नाही.
आदिवासींचा जीव टांगणीला
घरकूल योजनेअंतर्गत बांधलेल्या सर्वच घरांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ही घरे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक घरांचे छत गळके असून दरवाजे निखळले आहेत. शुक्रवारच्या घटनेची पुनरावृत्ती कधीही होऊ शकते. त्यामुळे फणसवाडी व चाफेवाडी या आदिवासीवाड्यातील रहिवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत.
घरकूल योजनेतील कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी
घरकूल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली घरे निकृष्ट दर्जाची आहेत. वर्षभरातच त्यांची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे आदिवासींचा जीव धोक्यात आला असून संंबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सभापती
शत्रुघ्न काकडे यांनी केली आहे.
जुन्या प्रांत कार्यालयाची पडझड
पनवेल शहरातील जुन्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीचा काही भाग गुरुवारी रात्री ९.४५ मिनिटांनी कोसळला. ही इमारत पालिकेने धोकादायक घोषित केली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रांत कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम जीर्ण झाल्याने चार वर्षांपूर्वी ती रिकामी करण्यात आली होती. इमारतीच्या आजूबाजूला रहिवासी संकुल असल्याने पालिकेने शुक्रवारी इमारत जमीनदोस्त केली.