मोकळ्या भूखंडावर बांधकाम साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:26 AM2019-01-28T00:26:10+5:302019-01-28T00:26:22+5:30
महापालिकेच्या स्वच्छता अभियानात खोडा, कारवाईकडे दुर्लक्ष
नवी मुंबई : शहरात सध्या स्वच्छता अभियानाचा जागर सुरू आहे. महापालिकेने त्यासाठी कंबर कसली आहे; परंतु अनेक ठिकाणी या मोहिमेत अडथळा आणण्याचे अप्रत्यक्ष प्रयत्न काही बेकायदा व्यावसायिकांकडून होताना दिसत आहेत. कोपरखैरणे रेल्वेस्थानक परिसरातील सिडकोच्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे, त्यामुळे पादचाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने स्वच्छ अभियानाला त्याचा मोठा अडथळा निर्माण होताना दिसत आहे.
महापालिका आणि सिडकोने शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून रस्त्यावरील डेब्रिज, अनधिकृत फेरीवाले यांच्यावर अंकुश आणला जात आहे. विनापरवाना होर्डिंग लावण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे; परंतु शहराच्या काही भागांत या मोहिमेला सपशेल हरताळ फासला जात असल्याचे पाहावयास मिळते.
कोपरखैरणे सेक्टर ४ ए येथील शिव शंकर सोसायटीच्या जवळच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य विक्रीसाठी साठवून ठेवले आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग पुढे थेट रेल्वेस्थानकापर्यंत जातो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच पादचाºयांची गर्दी असते. तसेच या मार्गाच्या लगत असलेल्या सिडकोच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांवरही बांधकाम साहित्यविक्रेत्यांनी बेकायदेशीर कब्जा केला आहे. या ठिकाणी बांधकामासाठी लागणाºया विटा, रेती तसेच खडीचे ढीग साचले आहेत. याचा नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लगात आहे.
स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने संपूर्ण शहर कचरामुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार संबंधित विभाग कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. सफाई कर्मचारी तीन-तीन शिफ्टमध्ये शहराची साफसफाई करीत आहेत; परंतु अनधिकृतपणे पदपथ, रस्ते आणि मोकळ्या मैदानावर डम्प केलेल्या बांधकाम साहित्यांकडे मात्र महापालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
सिडको किवा महापालिकेच्या जागेवर कोणी अतिक्र मण करून बांधकाम साहित्य ठेवून पादचाºयांच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत असेल, तर अशा लोकांविरोधात त्वरित कारवाई केली जाईल. सध्या महापालिकेचे स्वच्छ भारत अभियान सुरू आहे, त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत या संदर्भात धडक कारवाई मोहीम सुरू केली जाईल.
- अशोक मढवी,
सहायक आयुक्त,
कोपरखैरणे विभाग.