वाशीतील बहु-उद्देशीय इमारतीचे काम रखडले; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:16 AM2019-07-21T00:16:55+5:302019-07-21T00:17:05+5:30

नऊ वर्षांपासून रखडपट्टी सुरूच । लोकप्रतिनिधींसह नागरिकांची नाराजी

Construction of multi-purpose building in Vashi; | वाशीतील बहु-उद्देशीय इमारतीचे काम रखडले; प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशीतील बहु-उद्देशीय इमारतीचे काम रखडले; प्रशासनाचे दुर्लक्ष

Next

नवी मुंबई : वाशीमधील महापालिकेच्या समाजमंदिराचे काम नऊ वर्षांपासून व विभाग कार्यालयाचे सात वर्षांपासून रखडले आहे. वेळेत काम पूर्ण करण्यात प्रशासनास अपयश आले आहे. या दिरंगाईविषयी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करता आलेले नाही. मनपा मुख्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, वंडर्स पार्क, सेंट्रल पार्क यापैकी एकही प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नव्हता. वाशीमधील महत्त्वाच्या इमारतींबाबतही रखडपट्टी सुरूच आहे. सेक्टर १४ मध्ये २०१० मध्ये समाजमंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले. दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु इमारतीचा काही भाग खचल्यामुळे बांधकाम थांबविण्यात आले आहे. सातत्याने नऊ वर्षे स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे हे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. या कालावधीमधील सर्व आयुक्तांनी इमारतीची पाहणी केली. विविध तज्ज्ञांची समिती नेमली व पुन्हा काम सुरू करण्यात आले. यानंतर दुसऱ्या मजल्यावरील काही भाग खचल्यामुळे पुन्हा काम थांबविण्यात आले आहे. प्रशासनाने ही इमारत पाडून नवीन बांधावी किंवा आहे ती इमारत दुरुस्त होत असल्यास ती करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. बांधकाम रखडलेल्या इमारतीचा गैरवापर सुरू झाला आहे. येथे रात्री मद्यपी व अमली पदार्थ ओढणाऱ्यांचा वावर सुरू झाला आहे.
वाशी विभाग कार्यालयाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी २०१३ मध्ये नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. २०१५ मध्ये विभाग कार्यालयाचे बांधकाम पूर्ण झाले पाहिजे होते; परंतु अद्याप काम पूर्ण झालेले नाही. एक इमारत बांधण्यासाठी सात वर्षे लागल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. विभाग कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. पण प्रत्यक्ष विभाग कार्यालय सुरू होण्यास अजून किती कालावधी लागणार हे स्पष्ट झालेले नाही. रखडलेल्या कामामुळे सात वर्षांपासून विभाग कार्यालय मासळी मार्केटच्या इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे.

वाशीमधील बहु-उद्देशीय इमारतीचे काम तब्बल नऊ वर्षे रखडले आहे. प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. या इमारतीमध्ये मद्यपींचा अड्डा सुरू झाला असून, प्रशासनाने एकतर बांधकाम पुर्ण करावे किंवा इमारत पाडून पुन्हा नवीन बांधावी. - प्रकाश मोरे, नगरसेवक, प्रभाग-५८

बहु-उद्देशीय इमारतीचा दुसरा स्लॅबही वाकला आहे. याविषयी पुणे इंजिनीयरिंग महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून अहवाल मागविला आहे. पुढील दहा दिवसांमध्ये याविषयी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू केली जाईल. - सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, महानगरपालिका

Web Title: Construction of multi-purpose building in Vashi;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.