नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी १३९ कृत्रिम तलावांची निर्मीती करण्यात आली असून २२ पारंपारीत तलावांमध्येही विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उत्सवासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांना १८ ऑगस्टपासून ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात विशेष कक्ष स्थापित करण्यात आला आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील २२ पारंपारीक तलावांमध्ये विसर्जनाची सुविधा आहे.
यामधील १४ तलावांमध्ये गॅबीयन वॉल टाकून त्याचे दाेन भाग तयार केले असून एका भागातच विसर्जन केले जाते. यामुळे संपूर्ण तलावामधील पाणी प्रदुषीत होत नाही. प्रत्येक विभागात मुख्य तलावाच्या शेजारी, उद्यान, मैदान व महत्वाच्या ठिकाणी कृत्रीम तलावाची सोय उपलब्ध करून दिली आहे. शहर अभियंता संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जागा निश्चीती करून एकूण १३९ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत.
कृत्रिम तलावांमुळे जलप्रदुषण कमी होणार आहे. गतवर्षीही १४०९० श्रीमुर्तींचे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आले होते. यावर्षीही जास्तीत जास्त नागरिकांनी कृत्रिम तलावांचा उपयोग करावा असे आवाहन मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे. सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांनीही नियमांचे पालन करून योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे.
विभागनिहाय कृत्रिम तलावाची संख्याविभाग - तलावबेलापूर - १९नेरूळ - २४वाशी - १६तुर्भे - १७कोपरखैरणे १५घणसोली - २१ऐरोली - १८दिघा - ९एकूण १३९