जेएनपीएच्या ३१४ कोटी खर्चाच्या अतिरिक्त लिक्विड कार्गो बर्थची उभारणी; ३०० मीटर जेट्टीवर दोन्ही बाजूला जहाजे लागण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 08:24 AM2023-03-26T08:24:08+5:302023-03-26T08:25:46+5:30
तरल पदार्थ हाताळणीची क्षमता दुप्पटीने वाढणार: ३० वर्षासाठी पीपीपी तत्वावर चालविण्यासाठी जागतिक स्तरावर निविदाही मागविल्या
मधुकर ठाकूर, उरण : जेएनपीएच्या लिक्विड बल्क टर्मिनलवर नव्याने ३१४ कोटी खर्चाच्या बांधण्यात येत असलेल्या ॲडिशनल लिक्विड बल्क टर्मिनलमुळे क्रूड ऑइल आणि तरल पदार्थ हाताळणीची क्षमता दुप्पटीने वाढणार आहे.एकाच वेळी दोन्ही बाजुला मोठ्या क्षमतेची जहाजे लागण्याची क्षमता असलेल्या ३०० मीटर लांबीच्या लिक्विड बल्क टर्मिनलचे काम मे- २०२३ अखेरीस पुर्णत्वास जाणार आहे.त्याआधीच हे लिक्विड बल्क टर्मिनल ३० वर्षं खासगीकरणातून (पीपीपी) चालविण्यासाठी जागतिक निविदाही मागविण्यात आल्या आहेत.याआधीच जेएनपीएने पाचही बंदरे खाजगीकरणातुन चालविण्यासाठी दिली आहेत.त्यामध्ये आता नव्याने तयार करण्यात येत असलेल्या ॲडिशनल लिक्विड बल्क टर्मिनलची भर पडली आहे.
जेएनपीएच्या मालकीच्या असलेल्या ३०० मीटर लांबीच्या सध्याच्या एसबी -०२ व एसबी- ०३ या दोन्ही बर्थ बीपीसीएल, इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत.या दोन्ही बर्थवरुन वर्षाकाठी ६.५ दशलक्ष टन इतक्या मोठ्या प्रमाणावर तरल पदार्थांची हाताळणी केली जाते.मात्र वाढत्या तरल पदार्थांच्या हाताळणीसाठी सध्याचे लिक्विड बल्क टर्मिनल अपुरे पडत आहेत.जहाजांसाठी प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे आयात व्यापाऱ्यांना नाहक अतिरिक्त वेळ, पैसा खर्च करावा लागतो.त्यामुळे आर्थिक नुकसान होते.
त्यामुळे जहाजांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी, आयातदारांना फायदा होईल या दृष्टिकोनातून आणि सध्याच्या दोन्ही बर्थवरुन वर्षाकाठी ६.५ दशलक्ष टनामध्ये आणखी वाढ करण्यासाठी ४.५ दशलक्ष टन लिक्विड कार्गोची क्षमता वाढवण्यासाठी जेएनपीए बंदर प्राधिकरणाने अतिरिक्त लिक्विड कार्गो हाताळणी सुविधा विकसित करण्याची योजना आखली आहे.जेटीच्या दोन्ही बाजूला २५००० ते ७०००० डीडब्ल्युटी ( डेडवेट टनेज) क्षमतेपर्यतची जहाजे एकाच वेळी हाताळण्याची सुविधा या जेट्टीला लागुन असलेल्या दुहेरी बर्थमध्ये आहे. अतिरिक्त लिक्विड बर्थचा विकास सध्याच्या लिक्विड कार्गो हाताळणी ऑपरेशन्सच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच बंदर वापरकर्त्यांसाठी व्यापार सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. नवीन टर्मिनलच्या विकासासह सुधारित पोर्ट परफॉर्मन्स निर्देशांकांवर वळण कमी करण्यासाठी किंवा ते रोखण्यासाठी आणि जेएनपीए बंदरातील द्रव मालाच्या मंद वाढीला प्रतिबंध करण्यासाठी सुधारात्मक उपाय करण्याचा बंदराचा हेतू आहे.
या ॲडिशनल लिक्विड बल्क टर्मिनल अंतर्गत असलेल्या एलबी-०१ व एलबी-०२ या जेट्टीची लांबी ३०० मीटर आहे. यासाठी २२४ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून पाइपलाइनच्या कामासाठी आणखी ९० कोटी रुपये असा एकूण ३१४ कोटी खर्च अपेक्षित आहे.हा प्रकल्प ३१ मे २०२३ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. ॲडिशनल लिक्विड बल्क टर्मिनल प्रकल्प ३१ मे २०२३ पर्यंत कार्यान्वित होण्यापूर्वीच जेएनपीएने खासगीकरण (पीपीपी) करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी जागतिक स्तरावर निविदाही काढल्या असल्याची माहिती पीपी ॲण्ड डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"