नवी मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. सराफांच्या ४२ दिवस सुरू असलेल्या संपामुळे यापूर्वीचा गुढीपाडव्याचा मुहूर्त चुकल्याने अक्षयतृतीयेचा मुहूर्त गाठत नागरिकांनी ज्वेलर्सच्या दुकानांत गर्दी केली होती. जुन, जुलै महिन्यांमध्ये असलेल्या लग्नाच्या मुहूर्तासाठीही दागिन्यांची खरेदी करण्यात आली. सोने खरेदीसाठी वेगवेगळे मोठे ब्रँड तसेच आॅनलाइन बाजारपेठही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली तरी अनेकांचा कल अजूनही पारंपरिक पद्धतीने सराफांकडून सोने खरेदी करण्याकडेच आहे. त्यामुळे संप असताना कित्येकांनी नेहमीचे व्यापारी नाहीत म्हणून सोने खरेदी करणे टाळले होते. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तानंतर दुसरा शुभमुहूर्त लवकर नसल्याने यावेळी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याची माहिती सराफ व्यापाऱ्यांनी दिली. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दागिने मिळावेत, याकरिता आठवडाभरापूर्वीच ग्राहकांनी आपल्या पसंतीच्या दागिन्यांची नोंद केल्याची माहिती वाशीतील कल्याण ज्वेलर्सच्या सराफ व्यापाऱ्यांनी दिली. सोन्याच्या दागिन्यांबरोबर सोन्याची नाणी खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत असल्याचे सराफांनी सांगितले.घर आणि वाहन खरेदीचा मुहूर्तघरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांनी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर घराचे स्वप्न पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. शहरातील नामांकित गृहनिर्माण संस्था, विकासकांनी खास ग्राहकांसाठी काही लाखांची सवलत, घरासोबत फर्निचर फ्री, सोन्याची नाणी, लकी ड्रॉ, दुचाकी अथवा चारचाकी, मॉड्युलर किचन अशा विविध आॅफर्स दिल्याचे पाहायला मिळाले. ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या आॅफर्सने गृहनिर्माण क्षेत्रातही कोट्यवधींची उलाढाल झाली. आॅटो कंपन्यांनीसुध्दा अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या आॅफर्स, विशेष सूट, आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. दुचाकी व चारचाकी गाड्यांची नोंदणी महिनाभरापूर्वीच करण्यात आली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी वाहन खरेदीचे प्रमाण कमी झाल्याची माहिती आॅटो कंपन्यांनी दिली.
सोने खरेदीसाठी मुहूर्त साधला
By admin | Published: May 10, 2016 2:12 AM