विकासकांकडून ग्राहकांची फसवणूक; गृहप्रकल्प कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:53 PM2019-09-09T23:53:31+5:302019-09-09T23:53:36+5:30
खोट्या प्रकल्पामुळे घराच्या स्वप्नांचा चुराडा
नवी मुंबई : हक्काचे घर मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्यांची तोतया विकासकांकडून फसवणूक होत आहे. अशा ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी कागदावरच प्रकल्प तयार करून त्यांचे दिवास्वप्न नागरिकांना दाखवले जात आहे. प्रत्यक्षात ग्राहकांनी पैसे भरल्यानंतर ते हडप करून विकासकांकडून पोबारा केला जात आहे.
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईत घर खरेदीस इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये शहराबाहेरील व्यक्तींचा मोठा सहभाग आहे. त्यांना जाळ्यात ओढून लुटण्याच्या उद्देशाने शहरात तोतये विकासक तयार झाले आहेत. एखादा प्लॉट आपल्याच मालकीचा असल्याचे अथवा सिडकोकडून वितरीत झाल्याचे भासवून त्यावर भव्य प्रकल्प उभारला जाणार असल्याचे भासवले जात आहे. याकरिता पनवेल, नवी मुंबई परिसरातील मोकळ्या जागांचा दिखाव्यासाठी आधार घेतला जात आहे. अशावेळी ग्राहकांकडून देखील सदर विकासक अथवा प्रकल्पाची सखोल चौकशी न करता लाखो रुपये गुंतवले जात आहेत. कालांतराने कागदावरचा प्रकल्प गुंडाळून विकासकाने पळ काढल्यानंतर फसवणूक झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात येत आहे.
चालू वर्षात अशा प्रकारच्या १४ गुन्ह्यांची नोंद गुन्हे शाखेच्या आर्थिक विंगकडे झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक गुन्हे पनवेल, उलवे व लगतच्या परिसरातील गृह प्रकल्पाच्या माध्यमातून झाले आहेत. त्यामाध्यमातून शेकडो ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे. या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी संबंधित विकासकांना अटक देखील केलेली आहे. मात्र नागरिकांनी घरासाठी गुंतवलेले लाखो रुपये अशा प्रकरणात गुंतूनच राहत आहेत.
घर खरेदी-विक्रीच्या बहाण्याने नागरिकांची वाढती फसवणूक लक्षात घेता पोलिसांनी अशा गुन्ह्यातील तोतया विकासकांवर कठोर कारवाईचेही पाऊल उचलले आहे. त्यानुसार वेगवेगळ्या प्रकल्पात ८०० हून अधिक ग्राहकांची फसवणूक करणारा विकासक सचिन झेंडे याला अटक केली आहे. त्याने अम्रित डेव्हलपर्स आणि निसर्ग कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून भव्य गृहप्रकल्प उभारणी सुरू असल्याची माहिती देऊन इच्छुकांकडून गुंतवणूक करून घेऊन कोट्यवधींचा अपहार केलेला आहे. त्याशिवाय अनधिकृत इमारती उभारून त्यामधील घरांची विक्री करून फसवणूक करणारे रॅकेट देखील नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात चालत आहे. सिडको अथवा महापालिकेच्या मोकळ्या भूखंडाची माहिती मिळवून त्यावर इमारती उभारल्या जात आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे तिथली अनधिकृत घरे अधिकृत असल्याचे भासवून त्याची विक्री केली जात आहे. अशा प्रकारांच्या माध्यमातून देखील अनेकांची फसवणूक सुरूच आहे. सद्यस्थितीला शहरातील प्रत्येक नोडमध्ये अशा प्रकारची बांधकामे दिसून येत आहेत. भूखंडांशी संबंधित २२ गुन्ह्यांची नोंद गुन्हे शाखा पोलिसांकडे चालू वर्षात झाली आहे.