विदेशी फळांनाही ग्राहकांची पसंती; वर्षाला ५ हजार कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 02:15 AM2019-12-29T02:15:29+5:302019-12-29T02:15:46+5:30

७४ हजार टन फळांची विक्री

Consumer preference for exotic fruits | विदेशी फळांनाही ग्राहकांची पसंती; वर्षाला ५ हजार कोटींची उलाढाल

विदेशी फळांनाही ग्राहकांची पसंती; वर्षाला ५ हजार कोटींची उलाढाल

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : विदेशी फळांनाही आता भारतीयांची पसंती मिळू लागली आहे. वर्षभरामध्ये तब्बल ७४ हजार १४ टन फळांची देशाच्या विविध भागांमध्ये विक्री झाली असून तब्बल ५५८७ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे. यामध्ये सफरचंदसह किवी, पेर, ड्रॅगन फ्रूटची सर्वाधिक विक्री होत आहे.

नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागृती वाढू लागल्यामुळे नियमित आहारामध्ये फळांना प्राधान्य मिळू लागले आहे. हंगामानुसार उपलब्ध होणाऱ्या फळांची सर्वाधिक विक्री होत असली तरी काही फळांना वर्षभर मागणी असल्यामुळे शीतगृहांमध्ये ठेवून त्यांचा ग्राहकांना पुरवठा केला जात आहे. मुंबईसह राज्यातील प्रत्येक मार्केटमध्ये देशी फळांबरोबर विदेशी फळेही उपलब्ध होऊ लागली आहेत. सद्य:स्थितीमध्ये सफरचंद, पेर, चेरी, किवी, ड्रॅगनफ्रूट, संत्रा, चिंचा व हंगामाप्रमाणे आंबा, द्राक्षही विदेशातून विक्रीसाठी येऊ लागली आहेत. सध्या किवी व ड्रॅगनफ्रूटचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केले जात आहे. डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांमध्ये शरीरातील पेशी कमी झाल्यास या फळांच्या सेवनामुळे पेशी वाढण्यास मदत होते, अशी माहिती समाज माध्यमांमधून पसरविली जात असल्यामुळे डेंग्यू व मलेरियाची साथ पसरली की या फळांची विक्रीही वाढते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

विदेशी फळांच्या उलाढालीमध्ये प्रत्येक वर्षी चढ-उतार होत आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये ४,८१८ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०१७-१८ मध्ये यामध्ये घट होऊन ती ४,५७० कोटी झाली. २०१८-१९ मध्ये ही उलाढाल ५,५८७ कोटी रुपयांवर गेली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही विदेशी फळांची आवक होत आहे. देशी फळांच्या तुलनेमध्ये विदेशी फळांची आवक कमी असली तरी काही ठरावीक विदेशी फळांना वर्षभर मागणी असते. फक्त मुंबईमध्येच नाही, तर राज्यातील छोट्या शहरांमध्येही आता विदेशी फळांची विक्री होत असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशी फळांची सर्वाधिक विक्री होत असते. देशी फळांबरोबरच मागील काही वर्षांमध्ये विदेशी फळांचीही आवक होत आहे. सफरचंद, किवी, ड्रॅगनफ्रूट, चेरी, द्राक्ष, पेर, चिंच, संत्रा व इतर काही फळे विदेशातून विक्रीसाठी येतात. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्येही आता विदेशी फळे सहज उपलब्ध होत आहेत.
- संजय पानसरे, व्यापारी, मुंबई बाजार समिती

या देशातून येतात फळे
सफरचंद - न्यूझीलंड, अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, जपान, आॅस्ट्रेलिया, चीन
पेर - अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका
द्राक्ष - अमेरिका, थायलंड
चेरी - आॅस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा
किवी - इराण, न्यूझीलंड
ड्रॅगनफ्रूट - थायलंड, रशिया
संत्रा - हाँगकाँग, अमेरिका
आंबा - दक्षिण आफ्रिका

वर्षनिहाय फळांची उलाढाल
वर्ष उलाढाल (कोटी)
२०१६-१७ 4,818
२०१७-१८ 4,570
२०१८-१९ 5587

Web Title: Consumer preference for exotic fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.