घर खरेदीत फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्यायालयाकडून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:49 AM2018-03-10T06:49:14+5:302018-03-10T06:51:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : घर खरेदी करणाºया ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पैसे घेऊन घरांचा ताबा ग्राहकांना दिला जात नाही, उलट कायदेशीर प्रक्रियेत ग्राहकांची फसवणूक केली जाते. उलवे नोड मधील सेक्टर १७मधील असाच प्रकार उघडकीस आला आहे. जागामालक कंपनीने विकासक व ग्राहकांची अडवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने जमीनमालकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे एकूण ५८ कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
उलवे नोड सेक्टर १७मधील विश्रृत इन्फोटेक प्रा. लिमिटेड या कंपनीच्या मालकीचा भूखंड विकसित करण्यासाठी श्रीजी असोसिएटस या कंपनीला दिला होता. २०१३ साली ५० टक्के हिश्श्याचा करारनामा करून २७ सदनिका आणि २ गाळे जमीनमालक म्हणजे विश्रृत इन्फोटेकला देण्याचा कंपनीशी करण्यात आला. उर्वरित ५८ सदनिका आणि गाळे विकासकाच्या मालकीचे होणार होते. २०१४मध्ये इमारत विकासाचे काम वेगाने सुरू असताना विश्रृत इन्फोटेक कंपनीने विकसकाच्या मदतीने त्यांच्या मालकीच्या सदनिका आणि गाळे विकण्यास सांगितले. सदनिका आणि गाळे विकून आलेली १४ कोटी २० लाख रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे विश्रृत इन्फोटेक कंपनीला देण्यात आली. वेळोवेळी देण्यात आलेली रक्कम कंपनीने स्वीकारली आहे. तोपर्यंत विकासक श्रीजी असोसिएटस कंपनीने त्यांच्या हिश्श्याच्या ५८ सदनिका ग्राहकांना विकल्या होत्या. संबंधित इमारतीचे काम ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर मात्र विश्रृत इन्फोटेक कंपनीने विकासक आणि त्यांच्यातील व्यवहार नाकारण्यास सुरुवात केली. करारनामे असताना, सर्व व्यवहार चेकने झालेले असताना सर्व सदनिका व गाळ्यांवर हक्क सांगू लागले. विशेष म्हणजे भूखंड विकासकाच्या नावे करण्याकरिता विश्रृत इन्फोटेक कंपनीचे मालक विश्रृत त्रिपाठी यांनी सिडकोकडे केलेला अर्जदेखील आजमितीला प्रलंबित आहे.
मागील चार वर्षे बिल्डर आणि जमीनमालकाच्या वादामुळे इमारतीचे उरलेले २० टक्के काम पूर्ण झाले नाही. घर बुक केलेले ५८ कुटुंबे यामुळे वेठीस धरलेली आहेत. अखेर विकासकाने जमीनमालक त्रास देत असल्याबाबत वाशी पोलीस ठाण्यासह नवी मुंबई पोलिसांकडे दाद मागितली.
पोलिसांनी दाद न दिल्यामुळे विकासक श्रीजी असोसीएटसचे मालक विश्रृत इन्फोटेकचे अरुण त्रिपाठी, मीना त्रिपाठी, निशांत त्रिपाठी, विश्रृत त्रिपाठी या चौघांविरोधात न्यायालयात दाद मागितली. वाशीच्या सह प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश वाशी पोलिसांना दिले.
येत्या दोन दिवसांत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता तक्रारदार जिग्नेश गोराडिया यांनी व्यक्त केली.