वंडर्स पार्कमध्ये ग्राहकांची लूट
By admin | Published: February 6, 2016 02:30 AM2016-02-06T02:30:15+5:302016-02-06T02:30:15+5:30
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता वंडर्स पार्कमध्ये फूडकोर्टच्या नावाखाली ढाबा सुरू करण्यात आला आहे. मॉल्स व पंचतारांकित हॉटेलच्या
नामदेव मोरे , नवी मुंबई
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता वंडर्स पार्कमध्ये फूडकोर्टच्या नावाखाली ढाबा सुरू करण्यात आला आहे. मॉल्स व पंचतारांकित हॉटेलच्या दरामध्ये खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. २० रूपये किमतीची पाण्याची बॉटल २५ रूपयांना व ३४ रूपयांचे शीतपेय ५० रूपयांना विकले जात आहे. येथील लग्नकार्यासाठी व इतर कार्यक्रमांसाठी लॉन भाड्याने देण्याचे अधिकारही हॉटेलचालकास दिले आहेत.
महानगरपालिकेने जवळपास ३८ कोटी रूपये खर्च करून नेरूळ सेक्टर १९ ए मध्ये २० एकर भूखंडावर वंडर्स पार्क उभारण्यात आले आहे. १५ मार्च २०१२ ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर दोन वर्षे उद्यानामध्ये नागरिकांसाठी पाणी वगळता काहीही मिळत नव्हते. नागरिकांना स्वस्त दरामध्ये खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे यासाठी सप्टेंबरमध्ये महापालिकेने येथे फूड कोर्ट सुरू केले आहे. निविदा न काढताच फूडकोर्ट एका हॉॅटेलचालकाला चालविण्यास दिले आहे. २० एकर उद्यानाच्या मध्यभागी असलेले फूडकोर्ट पंचतारांकित हॉटेल व आधुनिक ढाब्याप्रमाणे वाढत आहे. महापालिकेने पूर्ण उद्यान हॉटेलचालकास आंदण दिले आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावर बाहेरील खाद्यपदार्थ आतमध्ये घेवून जाण्यास मनाई असल्याचा सूचना फलक लावण्यात आला आहे. वास्तविक अशाप्रकारे कोणताही निर्णय महासभेने घेतलेला नसताना हॉटेलचालकाने स्वत:ची मनमानी सुरू केली आहे. सुरक्षारक्षक गेटवर उद्यानामध्ये येणाऱ्यांच्या पर्स व बॅग तपासून बाहेरील खाद्यपदार्थ काढून बाहेरच ठेवण्याची सक्ती करत आहेत.
उद्यानामध्ये बेलापूर ते दिघा परिसरातील झोपडपट्टीमधील नागरिकही येत असतात. या नागरिकांना फूडस्टॉलमध्ये २० रूपयांची पाण्याची बॉटल २५ रूपयांना विकली जात आहे. ३४ रूपयांची पेप्सी ५० रूपयांना विकली जात आहे. २५ रूपयांचे शीतपेय ४० रूपयांना दिले जात आहे. समोसा ५० रूपये तर कांदा भजी ६० रूपयांना विकले जात आहे. सामान्य नागरिकांना हे दर परवडत नाहीत व घरून आणलेले किंवा बाहेरील वडापावसारख्या वस्तू खावू दिल्या जात नाहीत. उद्यान शहरवासीयांसाठी आहे की हॉटेलचालकाच्या फायद्यासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. फूडस्टॉलमधील वस्तूंचा दर कोणी ठरविला असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. सामान्य नागरिकांची अक्षरश: लूट सुरू आहे. महापालिकेचे अधिकारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. महापौर, आयुक्तांसह सर्वच नगरसेवकांना अंधारात ठेवण्यात आले आहे. याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. फूडस्टॉल तोडण्याचा शिवसेनेचा इशारा
सीवूडमधील शिवसेना शाखाप्रमुख समीर बागवान यांनी वंडर्स पार्कमध्ये होणारी लूट निदर्शनास आणून दिली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या सदर प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. चौगुले यांनी नागरिकांची लूट तत्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. उद्यान नवी मुंबईतील जनतेचे आहे. महासभेला व सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कँटीनमधील दर कसे ठरविले. बाहेरील खाद्यपदार्थ घेवून येण्यास मनाईचा फलक कोणाच्या परवानगीने लावला आहे याचा जाब विचारला जाईल. येथील मनमानी थांबविली नाही तर जनतेच्या हितासाठी शिवसैनिक फूड स्टॉल तोडून टाकतील असा इशारा चौगुले यांनी दिला आहे.