नैना क्षेत्रातील घरांकडे ग्राहकांची पाठ; ऑनलाईन अर्ज नोंदणीस सिडकोकडून २७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
By कमलाकर कांबळे | Published: October 23, 2023 07:47 PM2023-10-23T19:47:09+5:302023-10-23T19:47:48+5:30
नैना प्रकल्प परिसरातील सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.
नवी मुंबई : नैना प्रकल्प परिसरातील सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने या योजनेतील घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी २७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पूर्वी ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत १८ ऑक्टोबरपर्यंत होती. नैना प्रकल्पाच्या मंजूर डीसीपीआर नुसार ४००० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या भूखंडांवर गृहप्रकल्प बांधताना सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी २० टक्के जागा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांसाठी उपलब्ध करून देणे नैना प्रकल्प क्षेत्रातील विकासकांना बंधनकारक आहे.
त्यानुसार या क्षेत्रातील सात विकासकांनी सिडकोकडे तसा प्रस्ताव सादर केला असून त्या माध्यमातून १८१ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १७ तर अल्प उत्पन्न गटासाठी १६४ सदनिका आहेत. या सदनिकांच्या विक्रीसाठी सिडकोने १९ सप्टेंबर रोजी याेजना जाहीर केली होती. त्यात ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी १८ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून या काळात मिळालेला प्रतिसाद अत्यल्प असल्याचे समजते. त्यामुळे अर्ज नोंदणीसाठीची मुदत वाढवून ती २७ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे.
२२ नोव्हेंबरला सोडत
संगणकीय सोडत पूर्व निश्चित कार्यक्रमानुसार २२ नोव्हेंबर रोजीच होणार असल्याचे सिडकोने कळविले आहे. दरम्यान, या प्रक्रियेत सिडकोची भूमिका फक्त मध्यस्थीची असणार आहे. पात्र उमेदवारांची सोडत पद्धतीने निवड करून घरांच्या वाटपासाठी ती यादी संबंधित विकासकांना दिली जाणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.