नागोठणे : येथील टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणींचे कारण देऊन अनेक महत्त्वाच्या सेवा नाकारल्या जात असल्याने शहरासह परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. याबाबत नागोठणे शहर भाजपचे शहर अध्यक्ष सचिन मोदी यांच्या नेतृत्वाखाली टपाल कार्यालयात बुधवारी दुपारी निवेदन देण्यात आले. याबाबत येथील उप डाकपाल नरेश पाटील यांना विचारले असता, सर्व्हर कायम डाउन असल्यामुळे या अडचणी निर्माण होत असून, बीएसएनएल कंपनीकडून ही सुविधा मिळत असते, असे सांगितले.
नागोठणे टपाल कार्यालयात स्पीडपोस्ट, रजिस्टर, तसेच इतर अनेक सेवा अनियमित असल्याने, येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने अध्यक्ष सचिन मोदी यांचे नेतृत्वाखाली टपाल कार्यालयात पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे रोहे तालुका सरचिटणीस आनंद लाड, तालुका उपाध्यक्ष शेखर गोळे, तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रऊफ कडवेकर, नागोठणे शहर महिला आघाडी अध्यक्षा श्रेया कुंटे, शहर उपाध्यक्ष गौतम जैन उपस्थित होते. नागोठणे टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणी दाखवून महत्त्वाच्या अनेक सेवा नाकारल्या जात असल्याने, शहरासह परिसरातील गावांमधील नागरिकांना नाहक पायपीट करावी लागत असते. नागोठणे कार्यालय मध्यवर्ती असल्याने येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो.
विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर काम ठप्प होत असल्याने येथे इन्व्हर्टर बसवून का घेतला जात नाही? असा प्रश्न या निवेदनात करण्यात आला आहे. आपल्याला वरिष्ठ कार्यालयाशी योग्य तो पत्रव्यवहार करून जनतेची समस्या तातडीने मार्गी लावावी, अन्यथा नागोठणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांचेही या अनागोंदी कारभाराबाबत लक्ष वेधण्यात आले आहे.