बनावट सिमकार्डवरून मलेशियात संपर्क

By admin | Published: August 12, 2015 01:11 AM2015-08-12T01:11:18+5:302015-08-12T01:11:18+5:30

व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या पुजारी टोळीवर नवी मुंबई पोलिसांनी मोक्का लावला आहे. या टोळीच्या चौघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

Contact with fake simcard in Malaysia | बनावट सिमकार्डवरून मलेशियात संपर्क

बनावट सिमकार्डवरून मलेशियात संपर्क

Next

नवी मुंबई : व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या पुजारी टोळीवर नवी मुंबई पोलिसांनी मोक्का लावला आहे. या टोळीच्या चौघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यापैकी एक जण मलेशियातील अफताब आलम ऊर्फ हाजीच्या संपर्कात होता.
नवी मुंबईसह मुंबईच्या व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या चौघांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत ते रवी पुजारी टोळीसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. या टोळीने केलेल्या गुन्ह्याच्या तीव्रतेमुळे त्यांच्यावर मोक्का लावण्याचे पाऊल नवी मुंबई पोलिसांनी उचलले आहे. त्यामध्ये रवी पुजारीसह त्याचा हस्तक अफताब आलम ऊर्फ हाजी व अटकेत असलेला नदीम काझी (४९), प्रशांत मुल्या (२६), केशव भणगे (२८) आणि विनायक पालवे यांचा समावेश आहे. अफताबच्या नेतृत्वाखाली काझी हा नवी मुंबईत पुजारी टोळीचे काम पाहत होता. तो व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकवायचा. काझी हा सातत्याने मलेशियात लपलेल्या अफताब आलम ऊर्फ हाजीच्या संपर्कात होता. याकरिता तो मित्रांच्या नावाचे बनावट सिमकार्ड वापरत होता. अशी अनेक सिमकार्ड्स पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केली आहेत. काझीने मित्रांना विश्वासात घेऊन दोन ते तीन वर्षांपूर्वी त्यांच्याकडून वापरासाठी हे सिमकार्ड घेतलेले होते. हे मोबाइल त्याने घरात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते.
ठरल्याप्रमाणे त्याचे साथीदार प्रशांत, केशव व विनायक हे शहरात इस्टेट एजंट म्हणून वावरत होते. यादरम्यान एखादा मोठा व्यवहार समोर आल्यास त्या व्यावसायिकाची माहिती काझी हा मलेशियाला हाजीपर्यंत पोचवायचा. (प्रतिनिधी)

इस्टेट एजंट पोलिसांच्या रडारवर
इस्टेट एजंटचा व्यवसाय करणाऱ्यांनाही नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र केवळ मध्यस्थीच्या या कामात अधिक उत्पन्न असल्याने कर वाचवण्यासाठी अनेक जण या व्यवसायाची नोंद करत नाहीत. शिवाय त्यांच्यावर कसलेही बंधन नसल्याचाही फायदा त्यांना होतो. त्यामुळेच पुजारी टोळीचे तिघेही शहरात इस्टेट एजंटचे काम करत होते. परंतु या प्रकारामुळे इतरही इस्टेट एजंट पोलिसांच्या रडारवर आले आहेत. प्रॉपर्टीच्या व्यवहारात हात धुऊन घेणाऱ्या या एजंटमध्ये अनेकजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचीही शक्यता आहे.

Web Title: Contact with fake simcard in Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.