बेपत्ता साहाय्यक पोलीस आयुक्तांशी झाला संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:42 AM2018-04-09T05:42:19+5:302018-04-09T05:42:19+5:30
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या साहाय्यक आयुक्त राजकुमार चाफेकर यांच्याशी अखेर संपर्क झाला आहे. रविवारी सकाळी त्यांनी मध्य प्रदेश येथून पोलीस कंट्रोल रूमवर संपर्क साधून सुखरूप असल्याची माहिती दिली.
नवी मुंबई : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या साहाय्यक आयुक्त राजकुमार चाफेकर यांच्याशी अखेर संपर्क झाला आहे. रविवारी सकाळी त्यांनी मध्य प्रदेश येथून पोलीस कंट्रोल रूमवर संपर्क साधून सुखरूप असल्याची माहिती दिली. मात्र, त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण स्पष्ट नसून, मनस्तापातून घर सोडल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे साहाय्यक आयुक्त राजकुमार चाफेकर हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. शुक्रवारी रात्री ते घरी काही न सांगता, अज्ञात ठिकाणी निघून गेले होते. या वेळी त्यांनी मोबाइल फोनदेखील घरीच ठेवला होता. यामुळे दोन दिवस त्यांच्याशी कोणाचा संपर्क होऊ शकला नव्हता. कार्यालयातदेखील त्यांच्याविषयी कोणाला काहीच माहीत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर शनिवारी रात्री चाफेकर यांंच्या मुलाने ते हरवल्याची तक्रार एनआरआय पोलिसांकडे केली होती. त्यानुसार, नवी मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत होते. याचदरम्यान, रविवारी सकाळी चाफेकर यांनी स्वत: नवी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमवर संपर्क साधून, आपण मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे सुखरूप असल्याची माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक त्यांना घेऊन येण्यासाठी रवाना झाल्याचे समजते. मात्र, चाफेकर यांनी अचानक घर सोडून निघून जाण्यामागचे कारण समोर आलेले नाही, परंतु काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते, असे समजते. चाफेकर यांनी पोलीस निरीक्षक असताना, वाशी व नेरूळ पोलीस ठाण्यात काम केले आहे. साहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती झाल्यानंतर, त्यांची आयुक्तालयाबाहेर बदली झाली होती. वर्षभरापासून ते नवी मुंबई आयुक्तालयात सहायक आयुक्त पदावर कार्यरत आहेत.