मोहोपाडा : दहेजवरून पावडर घेऊन निघालेला एम ०४. ईबी ९९७२ हा कंटेनर एमआयडीसी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रिलायन्स काटा गेटजवळ चालक कंटेनर रस्त्याकडेला पार्क करून गेला. काही वेळानंतर कंटेनर चालक ईसरार अहम्मद पुन्हा परतला असताना, रस्त्याची साइडपट्टी खचल्याने कंटेनर नाल्यात पडल्याचे त्याने पाहिले. या कंटेनरमध्ये २१,६०० टन पावडर माल असल्याचे अहम्मद यांनी सांगितले आहे.कंटेनरला झालेल्या अपघातात कंटेनरचे व त्यातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सिद्धेश्वरी ते रिलायन्स काटा गेट या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी रस्ता खचल्याने क्रेनला अपघात होऊन क्रेन नाल्यात कोसळली होती. तरी या रस्त्याची तपासणी करून हा रस्ता व्यवस्थित करावा अशी मागणी वाहनचालक करत आहेत. (वार्ताहर) ट्रेलरला अपघातरोहा : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून खांब सुकेळी खिंड गावाच्या हद्दीत मालवाहू ट्रेलर पलटी होऊन अपघात झाला. यात वाहन चालकाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वाहन चालक सोमनाथ तिराजी (रा. रसायनी दादर) हे ट्रेलर (क्र. एम.एच. ४६/एफ. ८१३८) मध्ये कॉईल घेऊन मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने मुंबईकडून विळे माणगावकडे जात असताना अपघात झाला. यात वाहन चालक सोमनाथ गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकेला ट्रेलरची धडकवावोशी : गरोदर महिलेला कामोठे येथील रुग्णालयात घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला पाठीमागून वेगात आलेल्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याची घटना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. बुधवारी सकाळी १०८ रुग्णवाहिकेतून खालापूर येथे राहणारे विशाल जुईकर हे गरोदर पत्नी सोनाली हिला घेऊन एमजीएम कामोठे येथील रुग्णालयात निघाले होते. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना पावणेअकराच्या सुमारास चौक हद्दीत रुग्णवाहिका आली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेचा पाठीमागील दरवाजा पूर्णपणे चेपला गेला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ट्रेलर चालक महेशकुमार चौधरीविरोधात हयगयीने ट्रेलर चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी रुग्णवाहिका बोलावून सोनाली जुईकर यांना एमजीएम कामोठे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जुईकर यांनी दिली.
कंटेनर पडला नाल्यात
By admin | Published: March 31, 2017 6:30 AM