कंटेनर ट्रेलर कोसळून वाहनचालकाचा जागीच मृत्यू, जेएनपीटीची रेल्वे वाहतूक ९ तास ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 12:49 PM2021-11-22T12:49:27+5:302021-11-22T12:50:18+5:30
ट्रेलर पुलाखाली कोसळण्यापूर्वीच क्लिनरने प्रसंगावधान राखून सुरक्षितरीत्या उडी घेऊन जीव वाचविला. मात्र, कंटेनर चालकाला जीव वाचविणे शक्य झाले नाही.
उरण : जेएनपीटी-गव्हाण फाटा उड्डाणपुलाववर शनिवारी रात्री वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर ट्रेलर थेट मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे मार्गावर पडला. सुमारे ४० फूट उंचीवरून कोसळून झालेल्या अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर जेएनपीटीची रेल्वे वाहतूक ९ तास ठप्प झाली होती.
ट्रेलर पुलाखाली कोसळण्यापूर्वीच क्लिनरने प्रसंगावधान राखून सुरक्षितरीत्या उडी घेऊन जीव वाचविला. मात्र, कंटेनर चालकाला जीव वाचविणे शक्य झाले नाही. त्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कुर्ला, पनवेल येथील २०० कामगार तसेच पोलीस, वाहतूक पोलीस यंत्रणा घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. अंधारातच कर्मचाऱ्यांनी हायड्रो क्रेनच्या साहाय्याने रुळावर पडलेला कंटेनर ट्रेलर बाजूला केला. त्यानंतर अवघ्या अडीच तासातच युद्धपातळीवर रुळांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, २५०० हाय व्होल्टेजच्या तुटलेल्या ओव्हरहेड वायर जोडण्याचे काम रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होते.
या अपघातानंतर जेएनपीटीची पहिली मालवाहू ट्रेन सकाळी ७.३० वाजता रवाना झाली. त्याआधी डिझेल इंजिनवर धावणारी मालगाडी पहाटे ५.३० वाजता रवाना झाली असल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. रुळावरून पडलेला कंटेनर ट्रेलर तत्काळ बाजूला सारून अडथळा दूर करण्यात आल्याने जेएनपीटीच्या रेल्वे मालाच्या वाहतुकीवर कोणताही फारसा परिणाम झाला नसल्याचा दावा आयसीडीचे व्यवस्थापक आर. के. यादव यांनी केला.