- अनंत पाटील नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांतून प्रदूषित पाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने त्याचा फटका मासेमारांना बसला आहे. या दूषित पाण्यामुळे खाडीतील मासे मृत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरातील पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.नवी मुंबईतील औद्योगिक नगरीत रबाळे, महापे, पावणे, खैरणे, तुर्भे आणि शिरवणे परिसरात सुमारे चार हजारांहून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत. त्यातील १५ ते २० रासायनिक कंपन्या आहेत. त्यापैकी काही कंपन्यांतून प्रक्रिया न करताच सांडपाणी खाडीत सोडले जाते. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि टाकाऊ रसायनाचे ड्रमच्या ड्रम गटारातून सोडून दिले जाते.रसायनमिश्रीत लाल, तांबडे आणि काळ्या रंगाचे हे दूषित पाणी नाल्यातून थेट खाडीत जात असल्याने खाडीतील मासे व इतर जलचरांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खाडीतील मासे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यातील मासे खाणेही आरोग्यास अपायकारक ठरण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.महापे एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या नाल्यातील पाण्यात विविध प्रकारच्या घातक आणि जीवघेण्या रसायनांचे थर साचल्याचे दिसून येतात. प्लास्टिकबंदी असली तरी या नाल्यात प्लास्टिक बाटल्यांसह दारूच्या बाटल्यांचा थर दिसून येतो. रासायनिक कंपन्यांचे दूषित पाणी नाल्यावाटे थेट खाडीत जाते. या दूषित पाण्यामुळे खाडीतील मासे खोल समुद्रात जात आहेत. त्यामुळे किनाऱ्यावरील मासेमारीच्या व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे.पूर्वी ठाणे-बेलापूर पट्टीत खाºया पाण्यातील मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असे. मात्र, खाडीतील प्रदूषणामुळे आता ही मासळी दुर्मीळ झाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. एकूणच खाडीत सोडल्या जाणाºया प्रदूषित सांडपाण्यामुळे येथील पारंपरिक मासेमारी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेकडो मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे. मत्स्य दुष्काळामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.नवी मुंबईत रासायनिक कंपन्यांची संख्या फार कमी आहेत. अनेक कंपन्या बाहेरून कच्चा माल आणून त्यावर रिसर्च करून तयार माल भारतात आणि भारताबाहेर पाठविला जातो. कंपन्यातील दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी सोडले जाते.- के. आर. गोपी, अध्यक्ष, टी. एम. आय. एल. ठाणे-बेलापूर.
औद्योगिक वसाहतींंतील दूषित पाणी खाडीत; मासेमारी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:36 PM