सी-लिंक प्रकल्पाची सामुग्री जेएनपीटी बंदरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:00 AM2020-10-03T00:00:50+5:302020-10-03T00:01:11+5:30
फॅब्रिकेटेड आॅर्थोट्रॉपिक स्टील गर्डर्स प्राप्त झाल्याने पुलाचे बांधकाम वेगाने होणार असून, साइटवर डेकशी संबंधित कामही कमी होणार आहे.
मधुकर ठाकूर।
उरण : नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी बंदर आणि पुण्यात मुंबईहून जलदगतीने पोहोचण्यासाठी सुरू असलेल्या शिवडी-न्हावा-शेवा मुंबई ट्रान्स हार्बर सी-लिंक प्रकल्पासाठी लागणारी लाखो टनाची सामुग्री जेएनपीटी बंदरात गुरुवारी उतरविण्यात आली आहे. हाय फोन्ग बंदरामधून लोड केलेली ही सामग्री एल अँड टी आयएचआयच्या कंसायन्मेंटद्वारे आयात करण्यात आली आहे.
फॅब्रिकेटेड आॅर्थोट्रॉपिक स्टील गर्डर्स प्राप्त झाल्याने पुलाचे बांधकाम वेगाने होणार असून, साइटवर डेकशी संबंधित कामही कमी होणार आहे. आयात करण्यात आलेल्या या अवजड सामुग्रीमुळे प्रकल्पाचे काम अधिक वेगाने होण्यास फार मोठी मदत होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईला जेएनपीटी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडले जाणार आहे, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठीही कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. जेएनपीटीसाठीही एक मोठी उपलब्धी आहे. कारण ट्रान्स हार्बर लिंकच्या माध्यमातून नवी मुंबई ते मुंबईची दरम्यान निर्माण होणारी कनेक्टिव्हिटी मुंबई आणि उपनगरांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. हा पूल तयार झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत अत्यंत कमी वेळेत पोहोचणे सहज शक्य होणार आहे.
मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देशातील सर्वांत लांबीचा सागरी पूल आहे. मुंबईतील शिवडीशी जोडणाऱ्या २२ किलोमीटर
लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलासाठी १० हजारांहून अधिक गर्डरचा वापर केला जाणार आहे. त्यातील सुमारे १६.५ कि.मी. लांबीचा हिस्सा हा समुद्रात तर उर्वरित हिस्सा जमिनीवर असणार आहे. १०३३ मे.टन वजनाचे कॉलम, सपोर्टिंग स्ट्रक्चर आणि गर्डर्स - पूल बांधण्यासाठी वापरले जाणारे कंपाउंड स्ट्रक्चर असलेली ८४ पॅकेज जेएनपीटी बंदरात दाखल झाले आहेत. ‘एमव्ही पायोनियर ड्रीम’ या जहाजातून मोठ्या संख्येने दाखल झालेली सामुग्री उतरविण्यासाठी साडेपस्तीस तासांचा अवधी लागला.
आवश्यक साहित्य आयात
च्एमएमआरडीएने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठीचे (पॅकेज -१) शिवडी इंटरचेंजसहित मुंबई खाडीमध्ये १०.३८० किलोमीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामाचे काम एल अँड टी आणि आयएचआय कंसायन्मेंटद्वारे देण्यात आले आहे. हाय फोन्ग बंदरामधून लोड केलेली ही
सामुग्री एल अँड टी आयएचआयच्या कंसायन्मेंटद्वारे आयात केली होती.