ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ८ : अकरावी आॅनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना शनिवारीही महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. दरम्यान, या मुदतवाढीमुळे अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारऐवजी मंगळवारी जाहीर होणार आहे.
सहाय्यक शिक्षण संचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले की, अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी, ४ जुलैला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार, गुरूवार आणि शुक्रवारी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यास वेळ दिलेला होता. तर बुधवारी रमजान ईदनिमित्त महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. मात्र काही महाविद्यालयांत दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारनिमित्त सुट्ट्या देण्यात आल्या.
परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस कमी मिळाला होता. याची दखल घेत, उपसंचालक कार्यालयाने प्रवेशासाठी शनिवारी एक दिवस वाढीव दिलेला आहे. दुसऱ्या यादीत ५९ हजार ५०७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यांपैकी शुक्रवारी सायंकाळपर्यंत २७ हजार ३१० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतले होते. त्यामुळे अकरावीला आत्तापर्यंत एकूण १लाख २१ हजार १०१ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केले आहेत. याशिवाय १५ हजार ६५२ विद्यार्थी तिसऱ्या यादीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र प्रवेश घेतलेल्या आणि प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता मुंबई महानगर क्षेत्रातील हजारो जागा रिक्त राहण्याची भीती आहे.